डॉ. प्रदीप कुरुलकरची हेरगिरी : एटीएस अडकली मोबाईल लॉकमध्ये ! | पुढारी

डॉ. प्रदीप कुरुलकरची हेरगिरी : एटीएस अडकली मोबाईल लॉकमध्ये !

दिनेश गुप्ता/ महेंद्र कांबळे

पुणे : पाकिस्तानी ललनेच्या मोहात अडकून भारतीय संरक्षण विभागाची अत्यंत गोपनीय माहिती व कागदपत्रे देणार्‍या डीआरडीओचा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर याचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. जप्त मोबाईलचा पासवर्ड लक्षात नाही, असे नाटक करणार्‍या कुरुलकरला कोणीतरी आतलाच सहकार्य करीत असल्याचे तपास यंत्रणेच्या लक्षात आल्याने सर्व सूत्रे फिरली. कोठडीची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. 7) तपास पथकाने अर्ज करीत कोठडी वाढविण्यासाठी अर्ज सादर केला. मात्र, सुनावणी करणारे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांची बदली झाल्याने त्यांच्या समकक्ष न्यायालय नसल्याने तो अर्ज परत पाठविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पुणे येथील संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) दिघी येथील कुरुलकरने भारतीय संरक्षण दलाची गोपनीय माहिती शत्रुराष्ट्राच्या हाती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 3 मे रोजी गुन्हा दाखल करून एटीएसने अटक केली होती. अटकेनंतर जवळपास पंधरा दिवसांपासून येरवडा कारागृहात असलेला कुरुलकर तपास यंत्रणेला तपासात मदत करीत नसल्याचे दिसते. वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेल्या कुरुलकरने रॉकेट लॉन्चर व मिसाईलवर विषय संशोधन करून लष्करी सेवेत दिले आहेत. या सर्व संशोधनाची माहिती पाकिस्तानला पाठविल्याचे तपासात उघड झाले आहे.

आदल्या दिवशी न्यायालयात एटीएस अर्ज

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटकेनंतर ताब्यात घेतलेल्या तीन मोबाईलपैकी एका मोबाईलचा लॉक पुण्यातील फॉरेन्सिक लॅबकडून उघडला जात नसल्याचे समोर आले आहे. कुरुलकरही त्याचा पासवर्ड लक्षात नसल्याचे नाटक करून तपास यंत्रणेची दिशाभूल करीत आहे. अशातच लॅबमधील कोणीतरी कुरुलकरला वाचवत असल्याची शंका तपास अधिकार्‍यांना आली असून, अत्यंत गोपनीय पद्धतीने आज (दि. 7) न्यायालयात अर्ज दाखल करून कोठडी वाढवून देण्याची विनंती केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व खेळी दिशाभूल करण्यासाठी करण्यात आल्याचे समजते.

बंगळुरू फॉरेन्सिक लॅबची मदत

विश्वासनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तपासणी करण्याची माहिती झारीतील शुक्राचार्याची नजर चुकवून न्यायालयात केलेल्या अर्जात असे नमूद करण्यात आले होते की, जप्त केलेल्या एका मोबाईलमध्ये पाकिस्तानी लिंकचे पुरावे असून, त्याचा लॉक उघडण्यासाठी बंगळुरू फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्याची परवानगी द्यावी. याशिवाय जप्त केलेल्या हार्ड डिस्क त्या लॅबमध्ये पाठवून येथील लॅबने दिलेला अहवाल मॅच होतो का? हे देखील तपासले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

तपासासाठी राज्याबाहेरील यंत्रणा

कुरुलकर कृत्याचे नवनवे प्रयोग तपास यंत्रणेच्या हाती लागत आहेत. तपास यंत्रणेचे गुपित माहिती पुरवून त्याला मदत करीत असल्याचे अधिकार्‍यांच्या लक्षात आल्याचे सूत्रांनी सांगितले. समकक्ष न्यायालय नसल्याने बुधवारी परतलेला अर्ज गुरुवारी पुन्हा सादर केला जाणार असून, मोबाईलसह इतर तपासासाठी राज्याबाहेरील यंत्रणेची मदत मागितली जाणार असल्याचे समजते.

हेही वाचा

Maharashtra Premier League : ‘एमपीएल’मध्ये नौशाद ठरला सर्वात महागडा खेळाडू

नगरमधील पाथर्डी मार्गावरही खड्ड्यांमुळे अपघात

सनदी नोकरशाहीत मुलींचाच डंका!

Back to top button