नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ठेकेदाराने तीन वर्षांत ६७ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थाेरात यांनी नोटीस बजावून पैसे वसुलीचे आदेश दिले आहेत. या गैरव्यवहारात जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सखोल चौकशी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी जळगावमधील कंपनीस कंत्राट दिले आहे. या कंपनीमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा व महिला रुग्णालयांमधील रुग्णांसाठी लागणारे बेडशीट, उशीचे खोळ, ब्लँकेट्स, चादर, रुग्ण-डाॅक्टरांचे गाऊन, शस्त्रक्रियांसाठी लागणारे कपडे नियमित धुण्याची जबाबदारी होती. कपडे धुण्याचे बिल देताना केलेल्या तपासणीत धुतलेले कपडे आणि बिलात नमूद केलेल्या कपड्यांची संख्या जुळत नसल्याचे आढळून आले. तसेच बिलांमध्ये खाडाखोड केल्याचेही आढळून आले. त्यामुळे यासंदर्भात मार्च महिन्यापासून चौकशी सुरू होती. या चौकशीचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आल्यानंतर कपडे धुलाईत संबंधितांनी ६७ लाखांचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात धुतलेल्या कपड्यांपेक्षा जादा कपडे धुतल्याचे दाखवून बिलांमध्ये फेरफार करीत ६७ लाखांचे बिल काढल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी ३० लाखांचे बिल कंत्राटदारास देण्यात आले असून, उर्वरित ३७ लाखांचे बिल थांबवण्यात आले आहे. त्यामुळे जादा बिलाचे पैसे वसुलीसाठी संबंधित एजन्सीला नोटीस बजावल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.
जादा बिल दाखवून पैसे घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची साखळी असल्याचे बोलले जाते. जळगावमधील कंपनीकडून रुग्णालयातील कर्मचारी व एकाने कंपनीचा प्रतिनिधी म्हणून कपडे धुण्याची जबाबदारी घेतल्याचे समजते. त्यात कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या नावे सुरुवातीस व्यवहार केले. कालातंराने अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर व बिलांची रक्कम वाढत गेल्याने हा प्रकार उघड झाला. त्यामुळे या गैरव्यवहारात तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याची चर्चा