पुणे : प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर | पुढारी

पुणे : प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्यांनी भाजपला मदत करून पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांनाच वरिष्ठ नेत्यांकडून ताकद दिली जात असल्याचा आरोप माजी मंत्री रमेश बागवे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर केला. सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन पुण्यातील काँग्रेसमधील गटबाजी थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रदेश काँग्रेसच्या वतीने गत आठवड्यात मुंबईत लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. या वेळी पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या वेळी प्रदेशचे सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व माजी मंत्री यांनी थेट पुणे काँग्रेसमधील गटबाजीवर बोट ठेवत नेत्यांचेच कान टोचले. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

त्यात बागवे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी भाजपला मदत करीत पक्ष-विरोधी काम केले. त्यामुळे शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन मतदारसंघात पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. ऐन निवडणुकीत ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले, पक्षाचे उमेदवार पाडले त्यांना नेत्यांनी विचारले पाहिजे होते. पक्षाने तुम्हाला काय कमी केले.

मात्र, नेतेमंडळी पक्षविरोधी काम करणा-याच्या घरी जातात. त्यांना घेऊन बसतात, ताकद देतात. तुमच्याकडे येऊन एक बोलतात आणि तिकडे वेगळे काम करतात. अशा परिस्थितीत पक्ष मोठा कसा होणार, असा प्रश्न बागवे यांनी उपस्थित केला. बागवे म्हणाले, पहिले आपण एक होण्याची गरज आहे. काँग्रेसची ताकद मोठी आहे, पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. कसबा निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो. राष्ट्रवादी, सेना आपल्याबरोबर होती. त्यामुळे आपल्याला विजय मिळविता आला.

आता लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांना आपल्याला उमेदवारी द्यायची आहे. त्याला आतापासूनच ताकद दिली पाहिजे. त्यासाठी गटबाजी थांबली पाहिजे अन्यथा चर्चेला काही अर्थ नाही. कोणी मोठा होऊ नये असेच चालू आहे. नगरसेवक व्हायला दहा – पंधरा वर्षे लागतात. आमदार व्हायला पंचवीस वर्षे घालवावे लागतात. त्यानंतर आमदारकीचा उमेदवार तयार होतो, आपल्याकडे आता कोण आहे असा प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना पवार, ठाकरे यांचे पाठबळ : खा. किरीट सोमय्या

पुणे : ‘एक मूल-एक झाड’ संकल्पना रुजवा : अभिनेते सयाजी शिंदे

पुणे : माउंट एव्हरेस्ट मोहिमेस गेलेल्या स्वप्निल गरड यांचा मृत्यू

Back to top button