पुणे : माउंट एव्हरेस्ट मोहिमेस गेलेल्या स्वप्निल गरड यांचा मृत्यू | पुढारी

पुणे : माउंट एव्हरेस्ट मोहिमेस गेलेल्या स्वप्निल गरड यांचा मृत्यू

पुणे;  पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिस दलात कार्यरत असणारे पोलिस नाईक स्वप्निल गरड (वय 36) जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेले होते. त्यांचा ब्रेन डेड झाल्याने त्यांना काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना प्रकृती खालावल्याने बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले असताना गिर्यारोहक स्वप्निल गरड यांना ब्रेनडेड झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केल्याची माहिती पुणे पोलिस दलातील गरड यांच्या मित्रांनी दिली.

स्वप्निल गरड हे पुणे पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी ते गेले होते. शिखर सर केल्यानंतर ते पुन्हा बेस कॅम्पकडे परतत असताना कॅम्प थ्री इथे त्यांना प्रतिकूल हवामानाचा त्रास झाला. त्यातच अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांच्यावर काठमांडू येथे रुग्णालयात उपचार सुरू होते.

स्वप्निल गरड हे एक चांगले गिर्यारोहक असून, त्यांनी यापूर्वी विविध शिखर सर केले आहेत. मागील वर्षी त्यांनी नेपाळमधील माउंट अमा दबलम हे चढाईसाठी अवघड शिखर सर केले होते. ते शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केल्यावर एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला होता. परंतु जगातील सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंद फार काळ त्यांना घेता आला नाही.

हेही वाचा

भारत संरक्षण दलाच्या उत्पादनातील निर्यातीत 23 पट वाढ !

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना पवार, ठाकरे यांचे पाठबळ : खा. किरीट सोमय्या

Pudhari Editorial : वर्चस्वाचा खेळ!

Back to top button