भारत संरक्षण दलाच्या उत्पादनातील निर्यातीत 23 पट वाढ ! | पुढारी

भारत संरक्षण दलाच्या उत्पादनातील निर्यातीत 23 पट वाढ !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या बजेटमध्ये सर्वाधिक तरतूद संरक्षण दलासाठी केली जात असली, तरी त्यातील सर्वाधिक पैसा शुल्कापोटी विदेशात जात होता. संरक्षणमंत्र्यांसह पीएमओ कार्यालयाने यावर अभ्यास करून संरक्षण दलास लागणार्‍या साहित्याची निर्मिती केल्यास खर्च वाचवण्याबरोबर संशोधनानंतर निर्यात क्षमता वाढवता येऊ शकते यावर अभ्यास केला. कोरोनानंतर ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेत संरक्षण दलाच्या संशोधन विभागाने गरुडझेप घेत नवे संशोधन केले. याचा परिणाम म्हणून 85 देशांत भारतीय संरक्षण दलाने तयार केलेल्या उत्पादनाची मागणी वाढली. ही निर्यात 9 वर्षांत तब्बल 23 पटीने वाढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, पुण्यात सर्वाधिक संरक्षण संशोधन झाल्यानेच हा विक्रमी टप्पा गाठता आलेला आहे.

संरक्षण दलाने निर्यात उत्पादनात प्रथमच एवढी झेप घेतली असून, आजवरचा हा विक्रमी टप्पा आहे. लोकसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती संरक्षणमंत्र्यांनी पटलावर ठेवली. यात म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारत ही योजना सुरू होण्यापूर्वी संरक्षण दलात उत्पादित होणार्‍या उत्पादनाची निर्यात क्षमता 686 कोटी (2013-14) इतकी होती. त्यानंतर ‘मेक एन इंडिया व आत्मनिर्भर भारत’ या सारख्या योजनेत देशभरातील संशोधक लघु मध्यम व मोठ्या उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार केले गेले.

9 वर्षांत याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. 2022-23 या वर्षांत संरक्षण दलाची निर्यात 23 पटीने वाढून सुमारे 16 हजार कोटींवर गेली आहे. जागतिक स्पर्धेत हा मोठा विक्रम असून, भारत जगभरातील 85 देशांना संरक्षण उत्पादने निर्यात करत आहे. सुमारे 100 च्यावर ही उत्पादने विदेशात पाठवली जात आहे. यात महत्त्वाचा वाटा केंद्राने आखलेल्या योजनांचा आहे. निर्यात योजना अतिशय सोपी व सुटसुटीत केल्याने देश-विदेशातील उद्योजकांशी सामंजस्य करार सुलभ झाल्याने हा मोठा टप्पा गाठता आल्याचे आकडेवारीवरून दिसते.

विमाननिर्मितीत भारत अव्वल

भारताने विदेशात निर्यातीसाठी मोठ्या उत्पादनांची शृंखला बाजारात आणली आहे. यात डोर्नियार 228 ही विमाने आर्तीलारीअर्लालारी गन्स, ब्राह्मस्त्र मिसाईल, पिनका रॉकेट आणि लाँचर्स, रडार, सिमिल्यूएटर्स, शस्त्र वाहून नेणारी वाहने तयार केली आहेत. या भारतीय उत्पादनांना मोठी मागणी आहे. तसेच एलसीए तेजस विमान, लाईट कॉमबट हेलिकॉप्टर, एअर क्राफ्ट करिअर या उत्पादनास मागणी वाढली आहे.

भारतीय उद्योजकांना संधी

आत्मनिर्भर योजनेत भारतीय उद्योजकांना संशोधन व विकास कार्यात संधी दिली गेली. त्यामुळे दुसर्‍या देशांवर संरक्षण दलाच्या साहित्यासाठी अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले व आपली निर्यात वाढली. यापूर्वी विदेशातून 46 टक्के उत्पादने आयात केली जात होती.

हेही वाचा

पुणे : निवृत्त कर्नलही अडकला टास्क फ्रॉडच्या जाळ्यात

पुणे-बंगळुरू विमानाला तब्बल दहा तास उशीर

पुणे : ‘आयटी’ कंपनीला पायघड्या? मंत्र्यांच्या दबावामुळे पालिका अधिकार्‍यांच्या ‘जोर-बैठका’

Back to top button