

पुणे पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून बंगळुरूच्या दिशेने जाणार्या एअर एशिया कंपनीच्या विमानाला (विमान क्र. आय 5383) बुधवारी तब्बल 10 तास उशीर झाला. या विमान प्रवासासाठी पुणे विमानतळावर आलेले 100 प्रवासी दहा तास अडकून पडले होते. या प्रवाशांना विमान कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी पहाटे 4.55 वाजता पुण्याहून बंगळुरूसाठी एअर एशिया कंपनीच्या विमानाचे उड्डाण निश्चित होते. मात्र, या वेळी आलेल्या तांत्रिक समस्येमुळे या विमानाला 10 तास उशीर झाला.
यामुळे झालेल्या मनस्तापामुळे प्रवाशांनी विमानतळ टर्मिनलवर बसून कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आंदोलनासाठी ठाण मांडले. हे पाहताच येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांनी (सीआयएसएफ) ठाण मांडलेल्या प्रवाशांना उचलून बाजूला केले. दरम्यान, या वेळी या विमानातील प्रवासी आणि विमान कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये चांगलेच वाद झाले. याचे व्हिडीओ बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यामुळे विमान कंपन्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला.
विमानाला आलेल्या तांत्रिक समस्येमुळे पुणे विमानतळावर 100 प्रवाशांना येथे 10 तास अडकून राहावे लागले. त्यामुळे सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत विमानतळावर चांगलाच गोंधळ सुरू होता. पहाटे 4.55 वाजता उड्डाण असलेल्या विमानाने दुपारी 2.30 वाजता उड्डाण केले. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, या विमानाला आलेल्या तांत्रिक समस्येमुळे एअर एशिया कंपनीची विमानसेवा पुणे विमानतळावर विस्कळीत झाली होती.
हेही वाचा