संजय राऊतांवर कारवाई करून पोलिस संरक्षण हटवा : शिवतारे | पुढारी

संजय राऊतांवर कारवाई करून पोलिस संरक्षण हटवा : शिवतारे

सासवड (पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामतीकर पवारांचे हस्तक, आधी शिवसेना घालवली, पक्षचिन्ह घालवले, आता उरलीसुरली शिवसेना संपवून महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न खा. संजय राऊत करीत आहेत. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचा पोलिस बंदोबस्त हटवा. त्यांना राज्यातले लोक, महिला बांबूने, जोड्याने मारतील, अशी टीका माजी राज्यमंत्री व शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थ चौकात खा. संजय राऊत यांच्यावर केली. या वेळी संजय राऊत यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

आमदार संजय शिरसाट व कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, त्यांच्यावर थुंकण्याचे अश्लील काम राऊत यांनी केले म्हणून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी व त्यांचे पोलिस संरक्षण काढून घ्यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव, माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा महिला संघटक अ‍ॅड. गीतांजली ढोणे, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गिरमे, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य माणिक निंबाळकर, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य रमेश इंगळे, मा. नगरसेवक सचिन भोंगळे, बेलसरचे उपसरपंच धीरज जगताप, युवानेते श्रीकांत टिळेकर, राजाभाऊ झेंडे, उमेशअण्णा गायकवाड, परिंचे माजी सरपंच समीर जाधव, सासवड सेना शहरप्रमुख डॉ. राजेश दळवी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, युवासेना कार्यकर्ते अजित चौखंडे, मिलिंद इनामके, अंकुर शिवलकर आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे तुम्ही गप्प का?

पक्ष घालवला, चिन्ह घालवले, आमदार व खासदार गेले, शाखाप्रमुख गेले; तरीही पोपट संजय राऊत कोणाच्या आधारावर बोलतोय? त्याला तुमचा पाठिंबा आहे का? असे प्रश्न उध्दव ठाकरे यांना विचारून शिवतारे म्हणाले की, राऊतांच्या तोंडातून तुम्ही उद्धव ठाकरेच बोलताय का? असा संशय राज्यभर व्यक्त होत आहे.

मग एवढे नुकसान होऊनही तुम्ही गप्प कसे? असेही शिवतारे यांनी विचारले. बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्हीच आधी गद्दारी केली आणि स्वतःच्या स्वार्थापायी भाजप-सेनेला मिळालेली सत्ता पवारांच्या दावणीला बांधलीत. आता ’उबाठा’ शिवसेनेला कुलूप लावून त्याची चावी पवारांकडे देण्याचे काम संजय राऊत एक दिवस नक्की करणार आहेत, इकडे लक्षात ठेवा, असे शिवतारे यांनी ठणकावले.

हेही वाचा

पुणे-नगर महामार्गावर डॉक्टरांकडून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

वाल्हे मुक्कामी पंधराशे स्वच्छतागृहे; मुक्कामप्रमुखांची माहिती

बारामतीत काँग्रेसकडून पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख

Back to top button