

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बारामतीत पक्षाकडून फ्लेक्सवर त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला. महाविकास आघाडीत विविध कारणांनी धुसफूस सुरू असताना बारामतीत पटोले यांचा हा फलक लागल्याने चर्चा सुरू झाली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गुणवडी चौकात काँग्रेस कमिटीच्या बाहेर नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून फ्लेक्स लावण्यात आला आहे.
काँग्रेसचे ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी हा फलक लावला असून, त्यावर पटोले यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर थेट बारामतीत येत पवारांच्या कर्मभूमीत काँग्रेसच्या ओबीसी विभागाचा मेळावा घेत ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता त्यांच्या पक्षाने त्यांचा भावी मुख्यमंत्री, असा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादीकडून नेहमीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जातो. त्यांच्याच कर्मभूमीत पटोले यांचा हा फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहे.
याबाबत बनकर म्हणाले, पटोले हे आमचे आक्रमक नेते आहेत. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. कर्नाटकच्या एकहाती विजयानंतर आम्ही महाराष्ट्रातदेखील राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मुसंडी मारणार आहोत. पटोले हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे फ्लेक्सवर तसा उल्लेख केला.