पुणे-नगर महामार्गावर डॉक्टरांकडून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना | पुढारी

पुणे-नगर महामार्गावर डॉक्टरांकडून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी शिक्रापुरातील एका डॉक्टर दांपत्याचा अपघात होऊन महिला डॉक्टरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सामाजिक उपक्रम म्हणून स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेकडून पुणे-नगर महामार्गावर ब्लिंकर बसवण्यात आले आहेत.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर डॉ. मच्छिंद्र खैरे व डॉ. सोनाली खैरे हे दांपत्य 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कारमधून जात असताना ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात डॉ. सोनाली यांचा मृत्यू झाला होता. तर डॉ. मच्छिंद्र गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांच्यासह डॉक्टरांच्या टीमने पाहणी केली. तेव्हा महामार्गावर वाहनांवरील वेगमर्यादा कमी करण्याचा इशारा देणारे कोणतेही फलक अथवा ब्लिंकर नसल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे स्पंदन सामाजिक संस्थेकडून नुकतेच या ठिकाणी ब्लिंकर बसवण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे, डॉ. सुहास निकम, डॉ. हिरामण तुरकुंडे, डॉ. प्रीतम दरवडे, डॉ. अनंता परदेशी, डॉ. धनंजय लोंढे, डॉ. राम दातखिळे, डॉ. नितीन शिंगाडे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, डॉ. स्वप्नाली लोंढे आदी उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी बोलताना स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून सामाजिक बांधिलकी जपणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.

Back to top button