जुन्नर पर्यटन विकासाला वाटाण्याच्या अक्षता; पाच वर्षांनंतरही ’डीपीआर’ नाहीच

जुन्नर पर्यटन विकासाला वाटाण्याच्या अक्षता; पाच वर्षांनंतरही ’डीपीआर’ नाहीच

नितीन गाजरे

जुन्नर(पुणे) : जागतिक पर्यटन दिन साजरा होत असताना राज्यातील पहिला पर्यटन तालुका घोषित झालेल्या जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी सरकारकडून दुर्लक्ष झाले आहे. पाच वर्षांपूर्वी (21 मार्च 2018) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तालुक्याला पर्यटनाचा दर्जा दिला; मात्र अद्याप जुन्नर तालुक्यातील पर्यटनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्यात शासनाला अपयश आलेले आहे. नुकत्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पर्यटन विकासाच्या शिखर समितीमध्ये देखील जुन्नर पर्यटन विकासाबाबत चर्चा न झाल्याने जुन्नरवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निसर्गसंपन्न जुन्नर तालुक्याला ऐतिहासिक, धार्मिक, पुरातत्व वारसा, लेणी, निसर्ग, कृषी, वन्यजीव, गड-किल्ल्यांचे वरदान लाभले आहे; मात्र पर्यटनदृष्ट्या तालुक्याचा विकास झालेला नाही. तालुक्याच्या पर्यटन विकासातून पर्यटन उद्योग विकासासाठी तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री दिवंगत गिरीश बापट आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जुन्नर तालुक्याला शासन निर्णयाद्वारे राज्यातील पहिल्या पर्यटन तालुक्याचा दर्जा दिला; मात्र गेल्या पाच वर्षानंतरही शासनपातळीवर निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार झालेले नाही. यामुळे जुन्नर पर्यटन विकासाला अद्याप गती मिळालेली नाही.

नुकत्याच झालेल्या शिवजयंती (19 फेब—ुवारी) सोहळ्यानिमित्त राज्य शासनाने सोहळ्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करून, चार दिवसांचा महोत्सव केला. या महोत्सवात मोठ्या घोषणा केल्या; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तर राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये जुन्नर पर्यटन विकासासाठीच्या एकाही प्रकल्पाचा समावेश नव्हता. पर्यटन विकासाच्या या शिखर बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

पिंपळगाव जोगा येथे जलपर्यटनाची संधी

गोसी खुर्दच्या धर्तीवर जुन्नर तालुक्यात माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी, अशा चार धरणांची शृंखला आहे. यामधील पिंपळगाव जोगा सर्वांत मोठे धरण असून, हे धरण माळशेज घाट आणि हरिश्चंद्रगड पर्वतरागांमध्ये वसले आहे. या ठिकाणी मोठे जलपर्यटन केंद्र उभे राहू शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news