

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील दाट लोकवस्ती असणार्या साठेनगरलगतच्या लाकडाच्या वखारीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वखारमालकाचे मोठे नुकसान झाले. सुमारे 75 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या 65 वर्षांपासून सुरू असणार्या या वखारीला रविवारी (दि. 4) मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली.
आगीमुळे शेजारील इमारतीच्या खिडक्यांच्या काचांना तडे गेले. वखारीला आग लागल्याची माहिती वखार मालक भारत रतनसिंग पटेल यांनी बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन नियंत्रण विभागाला दिली. अग्निशमन दलाची गाडी माहिती देऊन एक तासाने पोहोचली. तत्पूर्वी एमआयडीसी अग्निशमन दलाची गाडी आली. तिने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आगीत लाकूड, दरवाजे आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
बारामतीत मागील काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. असे असतानाही माहिती मिळाल्यानंतर एक तासानंतर अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी आली. नगरपालिकेचा अग्निशमन विभाग अद्यापही तत्पर नसल्याचे यातून
दिसून आले.
आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ ती आटोक्यात यावी, यासाठी बारामती नगरपालिकेला अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आग विझविण्यासाठी पालिकेच्या दोन गाड्या आल्या होत्या. त्यातील एक गाडी नादुरुस्त असल्याचे समोर आले. यामुळे एक गाडी बाजूलाच उभी करावी लागली. बारामतीत असलेल्या अत्याधुनिक अग्निशमन यंत्राचा उपयोग काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.