मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीसांची दिल्लीवारी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी संध्याकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत केल्याचे समजते.
पुणे येथे रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 11 उड्डाणपुलांचे व भुयारी मार्गाचे भूमिपूजन व 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले, तर उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर येथून दिल्लीत पोहोचले.
सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरात चर्चा सुरू होत्या. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात होते. मात्र कोर्टाचा निकाल येऊन एक महिना उलटला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही.
विस्तार होत नसल्याने सत्ताधारी शिंदे गट तसेच भाजपामधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार करून आमदारांची नाराजी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 16 अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिंदे व फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन खलबते केल्याचे बोलले जात आहे.