आळंदी : पालखी सोहळ्यात यंदा फिरते भांडारगृह | पुढारी

आळंदी : पालखी सोहळ्यात यंदा फिरते भांडारगृह

आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : माउलींच्या पायी वारी पालखी सोहळ्यात लागणार्‍या विविध साहित्यांनी संस्थानचे भांडारगृह सज्ज झाले आहे. यंदाच्या वारीत ट्रकमध्ये देवस्थानाने कपाटे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू प्रवासातदेखील हवी ती वस्तू हवी त्या वेळी काढता येणार आहे. एकंदरीत फिरते भांडारगृहच यंदाच्या वारीत असणार आहे.

पालखी सोहळ्यात माउलींच्या रथासोबत असणारे पदाधिकारी, सेवकवर्ग, कमर्चारी यांच्या राहण्याची, जेवणाची सोय, त्यासाठी लागणारे साहित्य याची नोंद भांडारगृहात करण्यात येते व त्याप्रमाणे वारी काळात संपूर्ण व्यवस्था पाहिली जाते. भक्तनिवास या ठिकाणी भांडारगृह असून, याठिकाणी सोहळ्यासाठी लागणार्‍या विविध साहित्याची तजवीज करण्यात येते.

तब्बल एक महिन्याच्या प्रवासासाठी माउलींची पालखी निघणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत भांडारगृहातील साहित्य एका ट्रकमधून पालखीतळावर पोहोचलेले असते. त्यानुसार यंदा पालखी सोहळ्याच्या प्रवासात लागणारी स्वयंपाक भांडी, अब्दागिरी, शाली, पडदे, झुंबर, किराणा माल, पत्रावळी, पूजा-विधींची भांडी, पालखीवरील छत्र्या, समया, दानपेट्या, प्रभावळ, गरुडटक्के, चौरंग, बैलजोडी जुंपण साहित्य, रथाच्या डागडुजीचे साहित्य, तंबू, मंडप उभारण्याचे साहित्य, मंडप कापड, झालरी, गाद्या, बेडशीट, उशा, तांब्या-पितळीची भांडी, माउलींचे पोशाख, वीज दिवे, बॅटर्‍या, वीणा, पखवाज, स्टेशनरी साहित्य, पाट, श्रीफळ, गॅसशेगडी, सिलिंडर आदी साहित्याची भांडारगृहात जमवाजमव करण्यात आली आहे.

यंदाच्या वारीत ट्रकमध्येच कपाटे वापरणार आहोत. त्यामुळे वस्तू हव्या तेव्हा काढता येतील. पूर्वी सर्व वस्तू जमा करून ट्रकमध्ये रचून ठेवाव्या लागत होत्या. मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर त्या काढून पुन्हा वापरल्यावर पॅक करून ठेवाव्या लागत होत्या.

-श्रीकांत लवांदे, तुकाराम माने, वारी व्यवस्थापक

हेही वाचा 

मुंबई : आता कचऱ्याची तक्रार व्हॉट्सॲपवर करा !

मातृभाषा : अभिजात मराठी आणि भाषेविषयीची अनास्था

पुणे : पालखी सोहळ्यातील बोगस डॉक्टरांना बसणार चाप !

Back to top button