मुंबई : आता कचऱ्याची तक्रार व्हॉट्सॲपवर करा ! | पुढारी

मुंबई : आता कचऱ्याची तक्रार व्हॉट्सॲपवर करा !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा दिला तर त्याची तक्रार कुठे करायची असा प्रश्न मुंबईकरांना पडतो. त्यामुळे पालिकेने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कचऱ्याची तक्रार व्हाट्सअपवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईकरांना 8169681697 या नंबरवर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

मुंबई कचऱ्याची रोजच्या रोज साफसफाई होत असली तरी काही गल्ल्या व सार्वजनिक ठिकाणी वेळेत कचरा उचलला जात नसल्यामुळे तेथे कचरा दिसून येतो. त्यामुळे कचऱ्याची तक्रार करायची कुठे ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला होता. हे लक्षात घेऊन, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कचऱ्याची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र नंबर उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने मुंबईकरांसाठी व्हाट्सअप सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 8169681697 या क्रमांकावर नागरिकांना कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे या तक्रारीसंबंधीचे थेट छायाचित्र पाठवता येणार आहे. नागरिकांनी छायाचित्रासह, त्या ठिकाणाचा पत्ता व जीपीएस लोकेशन शेअर करणे आवश्यक आहे. तक्रार व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोंदणीकृत झाल्यानंतर, ती तक्रार संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे. एवढेच नाही तर, तक्रार निर्मुलनाकरीता लागणारा वेळ कमी होणार आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे निर्मूलन करून त्या ठिकाणी छायाचित्र अपलोड करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कचरा उचलला गेला की नाही, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

Back to top button