पुणे : पालखी सोहळ्यातील बोगस डॉक्टरांना बसणार चाप ! | पुढारी

पुणे : पालखी सोहळ्यातील बोगस डॉक्टरांना बसणार चाप !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्यामध्ये वारकर्‍यांवर उपचार करण्याठी अनेकदा बोगस डॉक्टर आढळून येतात. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय पथकांमार्फत बोगस डॉक्टरांचा शोध घेतला जाणार आहे. या शोध मोहिमेत स्थानिकांची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये दोन्हीही ठिकाणी ही शोध मोहीम सुरू असणार आहे. यासाठी पालखी मार्गावरील 60 ग्रामपंचायतींची मदत घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी बोगस डॉक्टर आढळून येतील, त्या कार्यक्षेत्रातील तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना पोलिसांमार्फत कारवाई करण्याच्या देखील सूचना केल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

त्याशिवाय चित्ररथातून आरोग्य शिक्षण देऊन पालखी सोहळा मार्गक्रमण करीत असलेल्या वारकर्‍यांमध्ये बोगस डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेऊ नयेत, याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. दोन्हीही पालखी मार्गांवर चित्ररथांमार्फत जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत दिंडीप्रमुख आणि वारकर्‍यांना आवाहन केले जाणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी कलर कोडनुसार पिशव्यांचा पुरवठा केल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.

वारकर्‍यांसाठी तीस आरोग्यदूत…

दोन्ही पालखी सोहळ्यांत वारकर्‍यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाकडून आरोग्यदूत नियुक्त करण्यात आले आहेत. या आरोग्यदूतांच्या माध्यमातून वारकर्‍यांना त्यांच्या जागेवर दुचाकीने जाऊन प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत. ताप, सर्दी, खोकला असल्यास त्यांची तपासणी करून औषध देणे तसेच जखम झाल्यास त्यावर उपचार करणे, ही सर्व कामे हे आरोग्यदूत करणार आहेत. पालखी मुक्काम किंवा विसाव्याच्या ठिकाणी एखाद्या आजारी व्यक्तीला रुग्णवाहिका शोधत त्या ठिकाणी यावे लागते. त्यामुळे वारकरीही उपचार घेण्यास टाळाटाळ करतात आणि आजार अंगावर काढतात. हे टाळण्यासाठी आणि वारकर्‍यांना आहे त्या ठिकाणी वेळेत औषधोपचार मिळावे, प्रत्येक वेळी रुग्णवाहिका शोधावी लागू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून आरोग्यदूत नेमण्यात आले आहेत.

हेही वाचा 

BJP TDP Alliance : अमित शहांचे चंद्राबाबू नायडूंसोबत विचारमंथन, भाजप-टीडीपीच्या युतीची दाट शक्यता

कपडे फाडण्याच्या भाषेवरून राजकारणाची पातळी घसरल्याचे दिसते..! सुषमा अंधारे

प्रेमात लैंगिक अत्याचाराचा अधिकार नाही! मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय

 

Back to top button