पिंपरी : भोसरीतील कुस्ती संकुलातून घडताहेत नवे मल्ल | पुढारी

पिंपरी : भोसरीतील कुस्ती संकुलातून घडताहेत नवे मल्ल

दीपेश सुराणा

पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवडमध्ये कुस्तीची परंपरा जुनी असून येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल तयार झाले आहेत. हा पारंपरिक खेळ नव्या पिढीत रुजविण्यासाठी आणि या खेळात नवे मल्ल घडविण्याचे काम भोसरीतील कुस्ती संकुलातून होत आहे. येथे 55 मुले कुस्तीचे धडे गिरवत आहेत.

काय शिकविण्यात येते?

भोसरीतील कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेणार्‍या मुलांना कुस्तीचे विविध डाव शिकविले जातात. कुस्तीसाठी लागणारी चपळता, जलद हालचाली, डावपेचातील कसब, प्रतिस्पर्धी मल्लाला लक्ष्य करून कशा पद्धतीने चितपट करायचे, याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे, कुस्तीसाठी करावा लागणारा व्यायाम मुलांकडून करून घेतला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने सपाटे मारणे, जोर, डिप्स यांचे सेट करून घेतले जातात.

त्याशिवाय, धावणे व अन्य व्यायाम प्रकार करून घेण्यात येतात. सोमवार ते शनिवार पहाटे 5 ते सकाळी 7 आणि सायंकाळी 4ः30 ते 7 अशा दोन बॅचमध्ये हे प्रशिक्षण दिले जाते. भोसरीतील कुस्ती संकुलाप्रमाणेच पिंपरी आणि चिंचवडलाही कुस्ती संकुल झाल्यास कुस्तीला आणखी वाव मिळेल, अशी अपेक्षा प्रशिक्षक आणि कुस्तीगीरांनी व्यक्त केली आहे.

कुस्तीतील कौशल्य वाढविण्यावर भर

भोसरी येथे अंदाजे 2 एकर जागेमध्ये मारुतीराव कुस्ती संकुल आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि नरसिंग रेसलिंग अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून येथे कुस्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे. येथे कुस्ती या खेळाचे प्रशिक्षण देताना प्रामुख्याने कौशल्य वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. 9 ते 25 वयोगटातील मुलांना येथे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून प्रशिक्षण दिले जात आहे.

आधुनिक पद्धतीची जीम, सोना बाथ, स्टीम बाथ यांची सुविधा आहे. कुस्ती प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 4 मॅट आहेत. मुलांना राहण्यासाठी 2 वसतिगृहे आहेत. तेथे 30 मुलांच्या निवासाची व्यवस्था आहे. तर, किमान 25 मुले हे शहर आणि परिसरातून येथे दररोज शिकण्यासाठी येतात. अशा एकूण 55 मुलांना कुस्तीच्या डावपेचात पारंगत करण्यात येत आहे.

मल्ल घडविण्याचे काम

पिंपरी-चिंचवड शहरातून कुस्तीमध्ये चांगले मल्ल तयार व्हावे, या उद्देशाने नरसिंग रेसलिंग अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. घरोघरी कुस्ती पोहोचली पाहिजे. तसेच, स्थानिक पातळीवर पैलवान घडावे, या उद्देशाने प्रामुख्याने कुस्ती प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. ऑलिंम्पिकमध्ये सहभाग घेतलेले कुस्तीगीर नरसिंग यादव यांच्या नावाने सुरू असलेल्या या अ‍ॅकॅडमीकडून मुंबई महापौर केसरी विजेते आणि एनआयएस कुस्ती प्रशिक्षक अजय लांडगे तसेच, एनआयएस कुस्ती प्रशिक्षक किशोर नखाते हे कुस्तीतील खेळाडू घडविण्याचे काम करत आहेत.

शहरातील चमकलेले प्रमुख मल्ल : विजय गावडे (भारत केसरी), नितीन बारणे, प्रसाद सस्ते, मुंबई महापौर केसरी
अजय लांडगे, देवेंद्र पवार, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, कुमार गटात राष्ट्रीय पदक विजेते प्रगती गायकवाड, ओमकार सुतार, जाधव यांच्यासह विविध मल्ल.

भोसरीतील कुस्ती संकुलात मिळालेल्या सुविधांमुळे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल येथून घडवू शकतो. आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यामुळे हे संकुल साकारले आहे. संकुलात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांतून ऑलिंपिक विजेते खेळाडू घडविण्याचे ध्येय आम्ही
ठेवले आहे.

– अजय लांडगे, महापौर केसरी विजेते आणि एनआयएस
कुस्ती प्रशिक्षक

भोसरी कुस्ती संकुलाप्रमाणेच चिंचवड आणि पिंपरीतदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल तयार व्हायला हवे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्याबाबत निर्णय घ्यायला हवा. त्यामुळे मुलांमधून चांगले कुस्तीगीर घडविण्यासाठी वाव मिळेल.

– संतोष माचुत्रे, सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर

हेही वाचा

लोणी : शासकीय कामांसाठी ‘क्रश सॅण्ड’चा वापर! महसूलमंत्री विखे पा.

मुंबई : आता कचऱ्याची तक्रार व्हॉट्सॲपवर करा !

हवामान : मान्सूनचा सांगावा

Back to top button