Criminals : गुन्हेगारांनी खंडणीसाठी टपरीचालकावर केले वार | पुढारी

Criminals : गुन्हेगारांनी खंडणीसाठी टपरीचालकावर केले वार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एका गुन्हेगाराने (Criminals) कारागृहात पाच ते सहा महिने काढली. तुरुंगातून त्याची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर चारजणांनी कोंढव्यातील पानटपरी चालकावा गाठले. त्याला थकलेले खंडणीचे पैसे मागितले. टपरीचालकाने ते नाकारले, त्यामुळे त्याच्यावर तलवारीने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार जणांसह त्यांच्या टोळक्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनिल रमेश चव्हाण (वय-20, रा. अप्पर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगेश अनिल माने (वय-23, रा. सुखसागरनगर), अखिलेश उर्फ लाड्या कलशेट्टी (रा. गोकुळनगर), सुरज बोकेफोडे (रा. माऊली नगर), सागर जाधव (रा. सुखसागरनगर) आणि त्यांचे दोन ते तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची कोंढवा बुद्रुक येथील साळवे गार्डन येथे पानटपरी आहे. मंगेश माने हा सराईत गुन्हेगार असून तो बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात पाच ते सहा महिने होता. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता. शुक्रवारी तो अनिल चव्हाण यांना भेटला. त्याने चव्हाण यांच्याकडे कारागृहात असताना थकलेली पोटगी मागितली.

पानटपरी सुरू ठेवायची असल्यास पैसे दे, अशी मागणी आरोपींनी केली होती. ती पूर्ण न केल्याने आरोपींनी तक्रारदाराला लाथा बुक्क्यांनी आणि तलवारीने मारहाण केली. तसेच, तेथे भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या मित्रावर देखील तलवारीने वार केले. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकावणे, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा (Criminals) दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील करत आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील म्हणाले की, “पानटपरी सुरू ठेवण्यासाठी व कारागृहात असतानाच्या काळातील हप्ता न दिल्याने सहा ते सात जणांच्या टोळक्याने पानटपरी चालकाला बेदम मारहाण करून, तलवारीने त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, याप्रकरणात खंडणी हा मुळ हेतू असल्याने याप्रकरणात खंडणीच्या कलमाची वाढ करण्यात येणार आहे.”

Back to top button