जिल्हा बँक : महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असाच रंगणार सामना | पुढारी

जिल्हा बँक : महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असाच रंगणार सामना

जळगाव : संसर्ग प्रादूर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँक निवडणुकची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल साठी बैठकांवर बैठका घेण्यात आल्या. जागा वाटपही ठरले परंतु या सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजप असल्याने तत्वांशी तडजोड करणार नाही, असे म्हणून कॉंग्रेसने बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सर्वपक्षीय आघाडीची झालेली बोलणी फिस्कटली.

अखेर रविवारी आ.गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या सर्वच्या सर्व २१ जागांवर भाजप उमेदवार देऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. आज  १७४ अर्ज दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडीसाठी २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. ११ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. रविवार अखरे ४०५ अर्ज विक्री झाले असून १०५ अर्ज शनिवार पर्यत दाखल झाले होते.  आज शेवटच्या दिवशी १७४ अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण २७९ अर्ज दाखल झाले.

रविवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयानुसार सोमवारी जिल्हा बँक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. यात खा.रक्षा खडसे, आ.गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, माजी खा. ए. टी. पाटील, आ संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ आदीं उमेदवारांनी भाजपातर्फे जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी अर्ज दाखल केले.

तर महाविकास आघाडीतून शिवसेनेतर्फे महापौर जयश्री महाजन, प्रा.अस्मिता पाटील, राष्ट्रवादीचे भुसावळ बाजार समिती सभापती सचीन संतोष चौधरी आदी उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत.

Back to top button