शरद पवारांचा हल्लाबोल : तपास यंत्रणा छापे टाकतात, खुलासा भाजप नेते करतात! | पुढारी

शरद पवारांचा हल्लाबोल : तपास यंत्रणा छापे टाकतात, खुलासा भाजप नेते करतात!

पिंपरी : पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. तपास यंत्रणा छापे टाकत आहेत. तर या कारवाईचा खुलासा आणि समर्थन भाजप नेते करत आहेत. याचा अर्थ राजकीय आकसातूनच कारवाई हाेत आहे. महाराष्‍ट्र, तामिळनाडू, प. बंगालमधील सरकार अस्‍थिर करण्‍यासाठी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे, अशा शब्‍दात राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी पुन्‍हा एकदा केंद्र सरकारवर हल्‍लाबोल केला.

केंद्र सरकारकडून तपास संस्‍थांचा गैरवापर

येथे आयोजित पत्रकार परिषदेत  शरद पवारांनी विविध मुद्‍यांवर आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. ते म्‍हणाले, केंद्र सरकार राजकीय आकसातून ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि एनसीबी या तपास संस्‍थांचा गैरवापर करत आहे. सीबीआयला राज्‍यात तपास करण्‍यासाठी राज्‍य सरकारची परवानगी घ्‍यावी लागते. मात्र अलिकडे एखाद्‍या राज्‍यात काही घडलं तर त्‍याचे लागेबांधे महाराष्‍ट्रात दाखवून सीबीआय महाराष्‍ट्रात कारवाई करते. राज्‍य सरकारला अडचणीत आणण्‍याचे काम सुरु आहे.

परमबीर सिंह कोठे आहेत?

अनिल देशमुख यांच्‍यावर भ्रष्‍टाचाराचे आरोप झाले. चौकशी योग्‍यरित्‍या व्‍हावी, यासाठी आम्‍हीच त्‍यांना राजीनामा देण्‍यास सांगितले. मात्र त्‍यावेळी मुंबईचे तत्‍कालिन पोलिस आयुक्‍त परमबीर सिंग यांनी अनेक आरोप केले. आता ते कोठे आहेत, ते देशात आहेत की परदेशात आहेत, याची माहिती नाही. पोलिस आयुक्‍तपदाचा व्‍यक्‍ती गायब होतो, याची माहिती घेण्‍याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. परमबीर सिंह यांच्‍याबाबतची माहिती केंद्रीय तपास संस्‍थांनी घ्‍यावी, असेही आव्‍हानही त्‍यांनी केंद्र सरकारला दिले.

राज्‍य सरकारला अस्‍थिर करण्‍याचे प्रयत्‍न

सीबीआय, ईडी, आयकर विभागाचा गैरवापर होत आहे. जे सरकार केंद्र सरकारच्‍या विचारांचे नाही, त्‍या सरकारला अस्‍थिर करण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे.  महाराष्‍ट्र, तामिळनाडू, प. बंगालमधील सरकार अस्‍थिर करण्‍यासाठी केंद्रीय तपास संस्‍थांचा वापर होत आहे. लोकप्रतिनिधी दडपणाखाली ठेवण्‍यासाठी कारवाई केली जात आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

मलिक राष्‍ट्रवादीचे प्रवक्‍ते म्‍हणूनच एनसीबीची त्‍यांच्‍या जावयावर कारवाई

नवाब मलिक हे राष्‍ट्रवादी काँग्रेस प्रवक्‍ते आहेत. ते केंद्र सरकारविरोधात बोलतात. त्‍यांच्‍यावर हल्‍ला करता येत नाही, त्‍यामुळे त्‍यांच्‍या जावायावर एनसीबीने कारवाई केली. त्‍यांना सहा महिने तुरुंगात ठेवले. या प्रकरणी न्‍यायालयाने म्‍हटलं आहे की, मलिक यांच्‍या जावायाकडे गांजा सापडला नाही तर एक प्रकारची वनस्‍पती होती. गांजा नसताना सहा महिने त्‍यांना तुरुंगात कसे ठेवले. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. कोणाचाही खिशात कोणतीही पुडी टाकून अमली पदार्थाचे सेवन करता, असा आरोप करुन त्‍याला अटक केली जावू शकते, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

एनसीबीचे साक्षीदारच गुन्‍हेगार

एनसीबी संबंधित यंत्रणा कोणालाही पकडणार, माल सापडला असे सांगणार, साक्षीदारही तेच ठरवणार, एका प्रकरणातील साक्षीदारच गुन्‍हेगार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. नवाब मलिक यांच्‍या जावयाविरोधातही अशाच साक्षीदारने पोलिसांनी सांगितले. पुणे पोलिसांनी त्‍याच्‍या अटकेची वाँरंट काढले आहे. गुन्‍हेगार आहेत त्‍यांना पंच कसे नेमता येईल. ड्रग्‍ज पार्टी प्रकरणातील एक पंच गुन्‍हेगार निघाला आहे. गुन्‍हेगारांना पंच करायचे आणि निर्दोष व्‍यक्‍तींना अडकवायचे हे कितपय योग्‍य आहे, असा सवालही त्‍यांनी केला.

माझ्‍या आग्रहामुळेच उद्‍धव ठाकरे मुख्‍यमंत्री

मुख्‍यमंत्री व्‍हायचे होते म्‍हणूनच मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांना आघाडी केली, असा आरोप होत आहे. आघाडी सरकारचा होताना माझाही सहभाग होता. सर्व आमदारांची बैठक आम्‍ही घेतली. उध्‍दव ठाकरे नेतृत्‍व स्‍वीकारण्‍यास तयार नव्‍हते. आमदारांच्‍या बैठकीत मीच त्‍यांना हातवर करायला लावला. मी आगृह केल्‍यानेच ठाकरे मुख्‍यमंत्री झाले. सर्वाधिक आमदार शिवसेनेचे होते. त्‍यामुळेच मी उद्‍धव ठाकरे यांना मुख्‍यमंत्री होण्‍याचा आग्रह धरला, ही वस्‍तुसिथ्‍ती फडणवीसांनी समजून घ्‍यावी, असेही ते म्‍हणाले. सत्ता गेल्‍याचा दु:ख फडणवीस यांना सहन हाेत नाही, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

छापा टाकला की पाच दिवस पाहुणचार घेतला…

अजित पवारांच्‍या तीन बहिणींच्‍या मालमतेवर आयकर विभागाने छापा टाकला. छापा टाकणारे त्‍यांच्‍या घरात एक ते दोन दिवस राहिले ठीक आहे; पण पाच दिवस १५ माणसांनी मुक्‍काम हाेता . त्‍यांचे वागणे बरोबर होते. मात्र तुम्‍ही तिथेच थांबा, असा आदेश त्‍यांना फोनवरुन येत होता. एखाद्‍याच्‍या घरी १५ माणसं पाठवणे योग्‍य आहे का, चौकशी करण्‍याचा अधिकार आहे. काम संपल्‍यानंतर किती दिवस पाहुचार करणार, वरुन आदेश असल्‍यामुळे ही मंडळी पाच दिवस बसून होती, असेही पवार यावेळी म्‍हणाले.

भाजपच्‍या जुन्‍या नेत्‍यावरही आकसातून कारवाई

एकनाथ खडसे हे २० वर्षांहून अधिक काळ भाजपचे विधानसभेचे नेते होते. ते राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये आले. तेव्‍हापासून त्‍यांच्‍यासह त्‍यांच्‍या कुटुंबीयांविरोधात खटले सुरु झाले आहेत. खडसे यांच्‍या पत्‍नींविरोधात कारवाई सुरु केली. अनेक वर्ष ज्‍यांनी भाजपचे नेतृत्‍व केले. त्‍यांना व त्‍यांच्‍या कुटुंबीयांविरोधात सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, हा नवीन प्रकार महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात सुरु आहे. याचा गांभीर्याने केला पाहिजे, असेही त्‍यांनी सांगितले.

प्रत्‍येकाच्‍या कामाची पद्‍धत वेगळी

यावेळी पवार म्‍हणाले, उद्‍धव ठाकरे मुख्‍यमंत्री झाले. यानंतर राज्‍यावर अनेक संकटे आली. मुख्‍यमंत्री व त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करत या संकटांचा मुकाबला केला. कोरोना काळात राज्‍यातील डॉक्‍टर, नर्स यांनी मोलाची साथ दिली. महाराष्‍ट्राचे आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी उत्‍कृष्‍ट काम केले. प्रत्‍येकाची कामाची पद्‍धती वेगळी असते. विरोधकांनी जाणीवपूर्वक मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे त्‍यांच्‍यावर टीका करु नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

तुम्‍ही काहीही करा, हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल

काहींनी ‘मी पुन्‍हा येणार’, अशा घोषणा दिल्‍या. मात्र त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण झाले नाही. आता राज्‍यातील सरकार स्‍थिर आहे. त्‍यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार अस्‍थिर करण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. तुम्‍ही दवाबतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्‍ही काहीही करु शकता. तरीही आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेलच, असा विश्‍वासही शरद पवार यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचलं का?

 

Back to top button