शेतकरी आंदोलन : सीमांवरून शेतकऱ्यांना हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल | पुढारी

शेतकरी आंदोलन : सीमांवरून शेतकऱ्यांना हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

पंजाबवरुन आलेल्या युवकाची सिंघू बॉर्डरवर निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच सीमांवर बसलेल्या आंदोलकांना ताबडतोब हटविण्याचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

सीमा अडवून ठेवण्यात आल्याने लाखो नागरिकांना त्रास होत असून आता तर सीमांवर हिंसाचार सुरु झाल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

स्वाती गोयल आणि संजीव नेवार यांच्यावतीने अ‍ॅड. शेखर झा यांनी ही याचिका दाखल केली आहे. पंजाबमधून आलेल्या लखबीर सिंग नावाच्या दलित युवकाची सिंघू बॉर्डरवर दसर्‍याच्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली होती. एकतर सीमांवर बेकायदेशीरपणे आंदोलन सुरु आहे, दुसरीकडे आता त्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुरु झाल्या आहेत, अशा स्थितीत आंदोलकांना सक्‍तीचे हटविण्याचे निर्देश दिले जावेत, असे याचिकेत म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली या लोकांनी प्रजासत्‍ताक दिनी दिल्‍लीतल्या रस्त्यांवर एकच धुमाकूळ घातला होता. कोरोना नियमांची खुलेआम पायमल्‍ली होत आहे तर आंदोलनस्थळी महिलांच्या छेडछाडीचे अनेक प्रकार झाले आहेत, त्यामुळे न्यायव्यवस्थेने याची गंभीर दखल घेेणे गरजेचे आहे, असे अ‍ॅड. झा यांनी सांगितले. कृषी कायदे 18 महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्याचे निर्देश गत जानेवारी महिन्यात देण्यात आलेले आहेत. मग आंदोलन कशासाठी सुरु आहे, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने चालू महिन्याच्या सुरुवातीला शेतकरी संघटनांना उद्देशून उपस्थित केला होता.

हे ही वाचलं का?

Back to top button