नवाब मलिकांनी उल्‍लेख केलेली 'लेडी डॉन' कोण? | पुढारी

नवाब मलिकांनी उल्‍लेख केलेली 'लेडी डॉन' कोण?

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्‍क

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणातील कारवाईवर सवाल करत ‘एनसीबी’चे पंच फ्‍लेचर पटेल कोण, असा सवाल नवाब मलिक यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून केला. तसेच फ्लेचर पटेल यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका महिलेसोबतचा फोटो दाखवून त्याखाली लिहिलेली कॅप्शनही प्रसिद्ध केली आहे. ही ‘लेडी डॉन’ कोण, असा सवाल उपस्थित केला. ‘लेडी डॉन’  च्या मदतीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय सुरु आहे? याचे समीर वानखेडे याचं उत्तर द्यावे, आवाहनही त्‍यांनी पत्रकार परिषदेत केले होते.

तेव्‍हापासून मलिक यांनी उल्‍लेख केलेल्‍या ‘लेडी डॉन’ कोण, अशी चर्चा सुरु झाली आहे. नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल आणि जास्‍मिन वानखेडे यांचा फोटोही पत्रकार परिषदेत दाखवला होता. यासंदर्भात एका हिंदी वृत्तवाहिनीने यासंदर्भात जास्‍मिन वानखेडे यांच्‍याशी संपर्क साधला.

‘या’ कारणासाठी तो मला म्‍हणतो, ‘लेडी डॉन’

यावेळी जास्‍मिन वानखेडे म्‍हणाल्‍या की, फ्‍लेचर पटेल हे माजी सैनिक आहेत. त्‍यामुळे माझ्‍या कुटुंबामध्‍ये त्‍यांना आदराचे स्‍थान आहे. माझी स्‍वयंसेवी संस्‍था आहे. ही संस्‍था महिला व बाल विकासाचे काम करते. मुलांना प्रशिक्षण देण्‍यासाठी आम्‍ही भारतीय सैन्‍यदलातील माजी सैनिकांची मदत घेतो. माझ्‍या संस्‍थेतील मुलांना क्रीडा प्रशिक्षण देण्‍याचे काम फ्‍लेचर पटेल करतात. फ्‍लेचर पटेल हा माझा मानलेला भाऊ आहे. मी गरीब महिलांच्‍या हक्‍कांसाठी लढते. त्‍यामुळे प्‍लेचर हा मला गंमतीने मला लेडी डॉन म्‍हणतो, असा खुलासा जास्‍मिन वानखेडे यांनी केला आहे.

संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार : जास्‍मिन वानखेडे

ड्रग्‍ज प्रकरणी अत्‍यंत हीन पातळीवर आरोप सुरु आहेत. माझी बदनामी करण्‍याविरोधात न्‍यायलयीन लढा उभारणार आहे, असेही या वेळी जास्‍मिन वानखेडे यांनी स्‍पष्‍ट केले. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणाला कलाटणी देण्‍यासाठी असे निराधार आरोप केले जात आहेत. ड्रग्‍जविरोधात कारवाई केल्‍यानेच आरोप करणार्‍यांना त्रास होतोय का, असा सवालही त्‍यांनी केला.

‘एनसीबी’ने फ्लेचर पटेल यांनाच का पंच केले, यावर बोलताना त्‍या म्‍हणाल्‍या , या प्रकरणी फ्‍लेचर पटेल हे साक्षीदार असतील तर त्‍यांनाच पंच करावे लागेल. याचे उत्तर ‘एनसीबी’च देवू शकते. ज्‍यांना ड्रग्‍जविरोधात कारवाई केल्‍याने त्रास झाला तेच निराधार आरोप करत आहेत, या सर्वांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button