ठाकरे-पवार सरकारला झुकावे लागले : किरीट सोमय्या - पुढारी

ठाकरे-पवार सरकारला झुकावे लागले : किरीट सोमय्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील १५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार पोलिसांना मान्य करावी लागली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी मला कल्पना दिली आहे. ठाकरे-पवार सरकारला याबाबत झुकावे लागले, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (दि.१३) सांगितले. ते पिंपरी येथे बोलत होते.

या वेळी सोमय्या म्‍हणाले,  ‘एसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी पुणे मुख्य कार्यालयात बैठक आहे. मी पुरव्याशिवाय बोलत नाही. पवार परिवाराचा एक अध्याय राज्यातील साडेबारा कोटी जनतेसमोर मांडणार आहे. हिंदुस्थानमधील पॉवर फुल पवार परिवाराविरोधात बुधवारी ३ वाजता पुण्यामध्ये पुराव्यानिशी मांडणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

ठाकरे-पवार सरकारमध्ये २४ पैकी १८ प्रमुख पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. काेराेना काळातही ठाकरे सरकारने घोटाळा केला आहे. त्यासंदर्भात ही चौकशी व्हावी. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचेही हात घोटाळ्यामध्ये आहेत, असा आराेपही त्‍यांनी केला.

या घोटाळे बहाद्दरांना वाचविण्यासाठी ठाकरे-पवार सरकारकडून आरोप-प्रत्यारोप करून आमच्या नावाचा वापर करण्यात येत आहे. भाजप शिवसेना युतीचा प्रस्ताव आहे. असे असले तरी ते भाजपबरोबर आले तरीही घोटाळे बहाद्दर यांची चौकशी होणार का? याबाबत  ते म्हणाले, कोणीही असो. घोटाळे करणाऱ्यांची चौकशी होणार. माझे जरी नाव आले तरी चौकशी होणारचं,असेही ते म्‍हणाले.

हेही वाचलं का? 

 

Back to top button