घराचे छप्पर फाडून उल्का आदळली महिलेच्या बिछान्यावर | पुढारी

घराचे छप्पर फाडून उल्का आदळली महिलेच्या बिछान्यावर

टोरांटो ; या जगतात पावलोपावली संकटं आहेत असे म्हटले जाते. अगदी स्वतःच्या घरात निवांत झोपलेलं असतानाही संकट येऊ शकते. त्याची प्रचिती कॅनडातील एका महिलेस नुकतीच आली. अंतराळातून कोसळलेली एक उल्का या महिलेच्या घराचे छप्पर फाडून तिच्या बिछान्यावर आदळली! निव्वळ दैव बलवत्तर म्हणून ही महिला वाचली.

या महिलेच्या उशीवर तिच्या डोक्यापासून काही इंच अंतरावर ही उल्का कोसळली. आपल्या डोक्याजवळच अचानक मोठा आवाज आणि धूर निर्माण झालेला पाहून रूथ हॅमिल्टन नावाची ही ब्रिटिश कोलंबियामधील महिला अतिशय घाबरली. तिने सांगितले, या आवाजाने मी दचकून उठले आणि विजेचे दिवे लावले. नेमकं काय झालं हेच मला कळत नव्हतं. नंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला.

लाईट लावल्यावर मला दिसले की उशीवर एक दगड पडलेला आहे. सामान्यपणे त्याच दिशेने तोंड करून मी एका कुशीवर झोपत असते. मात्र, ही उल्का कोसळण्याच्या घटनेवेळी मी तसे केले नव्हते हे सुदैवच! मी इमर्जन्सीला फोन लावून विचारले की जवळच एक बांधकाम सुरू आहे, तेथील दगड उडून आला आहे का? मात्र तेथील कर्मचार्‍यांनी आम्ही सुरुंग वगैरे लावून स्फोट घडवला नसल्याचे सांगितले.

आकाशातून एक तीव्र प्रकाश या घराच्या दिशेने आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर घराच्या छप्पराला छिद्र पडल्याचेही दिसून आले. या घटनेच्या एक रात्र आधीही लुईस लेकच्या परिसरातील लोकांनी एक उल्का कोसळत असताना पाहिले होते.

Back to top button