गिरीश बापट यांच्‍या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार का?

गिरीश बापट यांच्‍या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार का?
Published on
Updated on

भाग्यश्री जाधव; पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी ( दि. २९) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार का? असा प्रश्‍न उपस्‍थित झाला आहे.

गिरीश बापट हे खऱ्या अर्थाने लोकांचे खासदार होते. तीनवेळा नगरसेवक, पाचवेळा आमदार, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री आणि पुण्याचे खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. लोकांसाठी सदैव तत्पर राहावे, यासाठी रोज सकाळी ९.३० वाजता शनिवार पेठेतील त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवायचे. स्वतः कार्यालयात बसून लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे. गिरीश बापट यांच्‍या निधनाला २४ तास उलटण्याच्या आता नागरिकांची गैरसोय होवू नये म्‍हणून जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आज रोजच्या वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता हे कार्यालय सुरू ठेवण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांच्‍या सुविधेसाठी कार्यालयातील दैनंदिन कामे ही सुरू ठेवण्यात आली आहेत.

खासदार गिरीश बापट भाजपचे खासदार असले तरी सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रत्येक क्षेत्रातील पुणेकरांकडे खासदार गिरीश बापट यांच्या संदर्भातील अशी एक तरी आठवण नक्की आहे. बापटांच्या या 'हेल्दी' राजकारणाची प्रशंसा संभाजी ब्रिगेडने ही केली होती. पक्षातील असो वा इतर पक्षातील काम चांगले करणाऱ्या संघटनेला बापटांनी नेहमी प्रोत्साहन दिले. संभाजी ब्रिगेडने कधीही बापटांवर टीका केली नाही. त्यांच्या कामाचे कौतुक केले.

आता भाजपमधून 'या' नावांची चर्चा

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. आता भाजपकडे या जागेसाठी कोण हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत टिळकांच्या घरी उमेदवारी दिली नाही. याचा फटका भाजपला बसला अशी चर्चा आहे. पुणे लोकसभेसाठी ही गणिते वेगळी असतील. बापटांच्या घरात उमेदवारी द्यायची झाली तरी बापटांच्या सूनबाई आता कोणत्याही पदावर नाहीत. त्या सांगलीच्या माजी नगरसेविका होत्या; पण त्यांना आता एवढी मोठी जबाबदारी देली जाईल का, याबाबत साशंकता व्‍यक्‍त होत आहे. खासदारकीसाठी पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक अशी नावे चर्चेत आहेत. याचा पेक्षाही वेगळे नाव आयत्या वेळी येऊ शकते, अशी चर्चा आहे.

कसब्यात बसलेल्‍या धक्क्यानंतर भाजप धोका पत्करणार का..?

कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर ही निवडणूक भाजपसाठी एक आव्हान असेल. २०१९ लोकसभा निवडणुकीत खासदार गिरीश बापट ३ लाख मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळेचे राजकारण आणि गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. मागील निवडणुकीत शिवसेना भाजपबरोबर होती. आता शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आहे. मागील चार वर्षांमध्‍ये पुणे जिल्‍ह्यातील विधानसभेच्या दोन जागा भाजपने गमावल्या आहेत. वडगावशेरी आणि दुसरी महाराष्ट्रभर गाजलेली आणि २५ वर्ष भाजपच्या ताब्यात असलेली कसबा येथील. असा कसब्याची पुनरावृत्ती पुण्यात लोकसभेत होऊ नये याची भाजपला मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

महविकास आघाडीकडून कोण..?

पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. २०१९ मध्‍ये काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात होते. आता मोहन जोशी पुन्हा इच्छुक आहेत; पण पक्ष मोहन जोशी यांना उमेदवारी देईल का, याबाबत सांशकता व्‍यक्‍त होत आहे. कसबा निवडणुकीतून निवडून आलेल्या रविंद्र धंगेकरांचे नाव सध्या चर्चेत आहे. काँग्रेसमधून रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे मागील निवडणुकीवेळी इच्छुक होते. तसेच मराठा क्रांती मोर्चाचे प्रवीण गायकवाड ही काँग्रेसकडून इच्छुक होते. त्यामुळे काँग्रेस ही कसब्याच्या धड्यातून एक चांगला उमेदवार देऊन कासब्याची पुनरावृत्ती लोकसभेला करण्याचा प्रयत्न करेल. या जागेची राष्ट्रवादीने मागणी केली तर शहराध्यक्ष प्रशांत जगताप हा चेहरा असू शकतो किंवा खासदार वंदना चव्हाण यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

कायदा काय सांगतो…

पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागू शकते. 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुण्यात पुन्हा पोटनिवडणुक होऊ शकते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागते. तसेच ही निवडणुक ६ महिन्याच्या आत घ्यावी लागते. लोकसभा निवडणूक २०२४ मे एप्रिलमध्ये होत आहे. आत्ता मार्च महिना सुरु आहे. त्‍यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ आहे. त्यामुळे ही निवडणुक घ्यावी लागेल.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news