पूर्व हवेलीत गिरीश बापटांच्या अजोड कामगिरीचा उजाळा
जयदीप जाधव :
उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : खासदार गिरीश बापट यांनी पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळात पूर्व हवेली तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विकासकामे मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे जनतेकडून स्मरण होऊ लागले आहे. बापट यांच्या पालकमंत्रिपदाच्या काळात पूर्व हवेलीतील जुना बेबी कालवा सुरू करण्याचा प्रयत्न, खडकवासला कालव्याचे आवर्तन वेळेत मिळण्याची मागणी, तरडे येथील भारत पेट्रोलियमचे साठवणूक केंद्र विकसित करण्यातील त्यांचा पुढाकार, याबद्दलच्या आठवणींना लोक उजाळा देत आहेत.
शहरी राजकारणातील पालकमंत्री ग्रामीण भागातील प्रश्न कसा सोडवू शकतो, अशा प्रश्नांना पूर्व हवेली तालुक्यात धडाकेबाज निर्णय घेऊन गिरीश बापट यांनी चुटकीसरशी उडवून लावले. बापट हे शेतकर्यांशी संबंधित प्रश्न सोडवतील काय? या शंकांना त्यांनी कामातून उत्तर दिले. 2014 साली आघाडी सरकार सत्तेवर येताच, त्यांनी जुन्या बेबी कालव्यासाठी मुख्यमंत्री 21 कोटींचा निधी वितरित केला. या कालव्याद्वारे खडकवासला प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठी असताना त्यांनी शेतीची भूक भागविली. या परिसरातील विस्तीर्ण नर्सरी उद्योगाला या कालव्याचे पाणी तत्कालीन परिस्थितीत वरदान ठरले.
आजही या कालव्याच्या पाण्याने शेतीचा पाण्याचा मूळ प्रश्न मिटला आहे. गिरीश बापट यांच्या काळातच जिल्हा प्रशासनाच्या अचूक नियोजनाने त्यांनी अत्यल्प काळात तरडे येथील पुणे जिल्ह्यात आवश्यक असलेल्या भारत पेट्रोलियमच्या तेल साठवणूक केंद्राच्या जलद उभारणीची प्रक्रिया बापट यांच्या सूचनेनंतर प्रत्यक्षात येत होती. गिरीश बापट यांनी नेहमीच खडकवासला प्रकल्पातून शेतीला पाणी वाटपात दिलेले झुकते माप जनतेच्या स्मरणात आहे.
2016 व 2017 मध्ये पाणीबाणीच्या परिस्थितीतही त्यांनी शेतीच्या पाण्याचे अचूक नियोजन साधले होते. प्रत्येक शेतकर्याच्या प्रश्नात त्यांना प्रश्न सोडविण्याची तळमळ होती. शिरूर-हवेलीचे तत्कालीन दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे व गिरीश बापट हे त्या काळात 'दो हंसो का जोडा' ठरले होते. पूर्व हवेली तालुक्यात जेजुरी ते बेल्हे मार्ग व अष्टविनायक मार्गातील थेऊर ते लोणीकंद या दर्जेदार मार्गांची उभारणी या दोघांच्या प्रयत्नातून झाली आहे. लोणी काळभोर परिसरात आठ गावांत स्मार्ट व्हिलेज योजनेंतर्गत विकासाचा क्लस्टरसाठी दिलेला निधी आदी ठळक कामे पाचर्णे व बापट यांच्या प्रयत्नांतून झाली.

