खासदार गिरीश बापट यांचा अल्पपरिचय एका दृष्टिक्षेपात | पुढारी

खासदार गिरीश बापट यांचा अल्पपरिचय एका दृष्टिक्षेपात

पुढारी डिजिटल : भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

खा. गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी जन्म झाला. तळेगाव दाभाडेत प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बीएससी कॉमर्समधून ते पदवीधर झाले. त्यानंतर 1973 मध्ये टेल्कोमध्ये ते कामगार म्हणून रूजू झाले. कंपनीत कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा गिरीश बापट यांनी लढा दिला. आणीबाणीमध्ये नाशिक जेलमध्ये 19 महिन्यांचा कारावास गिरीश बापट यांनी भोगला होता जेलमधून आल्यानंतर राजकीय कारकीर्द त्यांची खऱ्या अर्थाने सुरू झाली. ते संघ स्वयंसेवक जनसंघापासून राजकारणाची सुरुवात त्यांनी केली. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पुणे महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. कसब्यातून सलग पाच वेळा ते आमदार म्हणून विजय झाले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मोहन जोशींचा त्यांनी पराभव करत विजय मिळवला होता.

पुण्याच्या राजकारणातील चाणक्य अशी गिरीश बापट यांची ओळख होती. दांडगा जनसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू. सर्व पक्षांसोबत प्रेमानं मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावाने त्यांचा राजकीय प्रवास नेहमीच सुखकर राहिलाय. संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. गिरीश बापट अनेक दिवसांपासून आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Back to top button