पुणे : सोमेश्वर कारखाना निवडणूक, अख्ख्या गावाचा मतदानावर बहिष्कार | पुढारी

पुणे : सोमेश्वर कारखाना निवडणूक, अख्ख्या गावाचा मतदानावर बहिष्कार

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा :

सोमेश्वर कारखाना निवडणूक : पंचवार्षिक निवडणुकीत वाघळवाडी गावाने पुन्हा बॅनरबाजी केलीय. अख्ख्या गावाने आमचं ठरलंय! म्हणत आता निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकायचा ठरवलं आहे. सोमेश्वर कारखाना निवडणुकीमध्ये कारखाना स्थापन झाल्यापासून प्रथमच अख्ख्या गावाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहे. वाघळवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ५) एकत्र येत गाव बैठकीत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवलं. नाराजीतून सोमवारीही बॅनर लावण्यात आले होते. याची जोरदार चर्चा बारामतीत पहायला मिळाली.

सोमेश्वर कारखाना निवडणूक धामधूम सध्या सुरु आहे. यामध्ये वाघळवाडी गावातील कोणालाही उमेदवारी देण्यात आली नाही. सोमेश्वर उभारणीसाठी ग्रामस्थांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनी कारखान्यासाठी विनामोबदला देण्यात आल्या. कारखाना उभारणीत मोठा सहभाग असलेल्या वाघळवाडी ग्रामस्थांना कारखाना स्थापन झाल्यापासून संचालकपदी संधी देण्यात आली नाही.

नोकर भरतीतही युवकांना वगळले जाते. कारखान्यात संधी मिळालेले संचालक आपल्या घरातील लोकांना नोकरी लावण्यात प्राधान्य देतात. गावातील युवकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बैठकीत ग्रामस्थांनी बोलून दाखविले. कारखाना स्थापन होऊन ६० वर्षे उलटूनही उमेदवारी दिली नसल्याने या वर्षी उमेदवारी मिळेल अशी खात्री होती. परंतु पुन्हा ठेंगा मिळाल्याने जवळपास ३०० ग्रामस्थ आणि युवकांनी एकत्र येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी पक्षाकडून गावातील पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ग्रामस्थांनी एकत्र येत पाच पैकी कोणत्याही एका उमेदवारांस उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली होती. परंतु उमेदवारी मिळणार अशी खात्री कारखाना परिसरात असताना उमेदवार यादी प्रसिद्ध होताच यादीत नावे न आली.

वाघळवाडी गावास संचालक पदापासून पुन्हा दूर ठेवण्यात आले. एका गावात दोनशे ते तीनशे मतदान असलेल्या गावात दोन उमेदवार दिलेत. या विरोधात गावातील सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला. कारखाना निवडणुकीत प्रचार करायचा नाही. प्रचारासाठी कोणी आले तर सहभाग घ्यायचा नाही. असा निर्णय घेण्यात आलाय.

Back to top button