Pune Murder : ओल्या अंडरवेअरमुळे झाला खुनाचा उलगडा! | पुढारी

Pune Murder : ओल्या अंडरवेअरमुळे झाला खुनाचा उलगडा!

अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी येथील संतोष विश्वनाथ माने या तरुणाचा (दि.०३) रविवारी दुपारी पुण्यातील (Pune Murder) त्याच्या राहत्या खोलीत खून झाला होता. या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, एका ओल्या अंडरवेअरमुळे आलेल्या संशयावरून पुण्यातील हिंजवाडी पोलिसांना या खून (Pune Murder) प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले असून संतोषचा खून त्याच्या शेजाऱ्यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मगरवाडी येथील संतोष विश्वनाथ माने सध्या पुण्यात हिंजवाडी भागात साखरेवस्तीत पत्नी आणि मुलांसह भाड्याच्या खोलीत राहत होता. बांधकाम व्यवसायासाठी मजूर पुरविण्याचे काम संतोष करीत असे. रविवारी (दि.०३) दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने सपासप वार करून संतोषचा खून केला.

संतोषची पत्नी घरी परतल्यानंतर ही भयंकर घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याप्रकरणी संतोषच्या पत्नीच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune Murder : ओल्या अंडरवेअरमुळे संशय

दरम्यान, खून भरदिवसा झाला होता आणि त्या ठिकाणी बाहेरून कोणीही आलेले नसल्याने हा खून कोणी व कशासाठी केला हा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यामुळे पोलिसांनी बारकाईने तपास सुरु केला असता सहा. फौजदार बंडू मारणे यांना शेजारच्या मुलाची आंघोळ केलेली ओली अंडरवेअर दिसली. घरातील सर्व कपडे सुकलेले आहेत. परंतु एकच अंडरवेअर ओली का? एवढया रात्री मुलाने आंघोळ का केली? असा संशय मारणे यांना आला आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कसून चौकशी केली. या चौकशीतून संतोष माने यांच्या शेजारी राहणारा कैलास अंकुश डोंगरे (वय २३) यानेच त्यांचा खून केल्याचे समोर आले.

सततच्या भांडणामुळे केला खून

पोलिसांनी तातडीने कैलास डोंगरे याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संतोष मानेचा खून केल्याची कबुली दिली. संतोष व त्याची पत्नी यांचे कैलासच्या आई वडिलांसोबत सतत भांडण होत असे. त्यामुळेच संतोषचा खून केल्याचे कैलासने पोलिसांना सांगितले. कैलासची चौकशी सुरु असून गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खडके हे करत आहेत.

नियोजनबद्ध तपास

सदरील क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या बारा तासात यश आले. घटनास्थळी पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, हिंजवाडीचे पोलीस निरिक्षक बाळकृष्ण सांवत, ‘एलसीबी’चे पोलीस निरिक्षक श्रीराम पौळ यांनी भेट देवुन तपास करण्यासाठी अचूक मार्गदर्शन केले. यापैकी एसीपी श्रीकांत डिसले आणि पीआय श्रीराम पोळ हे यापूर्वी बीड जिल्ह्यात कार्यरत होते.

सदरील कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उप आयुक्त आनंद भोईटे, सहा. आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सांवत, अजय जोगदंड, सुनिल दहिफळे, तपास पथकाचे प्रमुख सपोनि सागर काटे, सपोनि उध्दव खाडे, पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम, गाढवे, खड़के, सहा. फौजदार बंडु मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, कुणाल शिंदे, अतिक शेख, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कल्पेश बाबर, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडु, सुभाष गुरव, भिमा गायकवाड, आण्णराव राठोड, नुतन कोडे यांनी केली.

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button