कडूस ; पुढारी वृत्तसेवा : कडूस (ता. खेड) किवळे रस्त्यावर असणाऱ्या घोडेमाळ परिसरातील एका घरासमोरून बिबट्या जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काल (रविवार) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खंडेराव अरगडे यांच्या पत्नी घराबाहेर गेल्या हाेत्या. यावेळी त्यांना घराजवळ एक बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसला.
बिबट्याला पाहताच आरडाओरड करत त्या घरात गेल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शेतकरी आप्पा वाजे यांचा कुत्रा अचानक गायब झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
कडूस, रानमळा परिसरात बिबट्यांनी अनेकवेळा पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे.
मात्र आता हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अन्न पाण्याच्या शोधात बिबट्या लोकवस्तीमध्ये येत असून, पाळीव प्राण्यांची शिकार करत आहे.
या रस्त्यावरून औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार जात असल्याने त्यांच्यावरही हल्ले करण्याची शक्यता आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेंडे, सरपंच निवृत्ती नेहेरे, प्रमोद शिंदे, उद्योजक प्रताप ढमाले, चेअरमन पंडित मोढवे, सदस्य अनिकेत धायबर, बाळासाहेब धायबर, आप्पा वाजे, मोहन धायबर, कुमार धायबर, निलेश धायबर, कैलास डोंगरे आदीसह ग्रामस्थांनी केली आहे.