आळेफाटा : जमिनीच्‍या वादातून चहा टपरीचालकास मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

आळेफाटा : जमिनीच्‍या वादातून चहा टपरीचालकास मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या वादातून चहाच्या टपरी चालकास लोखंडी टॉमी आणि लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. १) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बेल्हे (ता. जुन्नर) गावचे हद्दीत हॉटेल विठू माऊली समोर घडली.

याप्रकरणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन म्हातारबा घोडे यांच्यासह पाच जणांवर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद दत्तात्रय पिंगट (वय-२३) हे बेल्हा गावचे हद्दीत हॉटेल विठू माऊलीसमोर असणाऱ्या स्वत:च्या चहाच्या टपरीजवळ झोपले होते.

शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाजार समितीचे माजी संचालक गजानन म्हातारबा घोडे यांच्यासह निखील गजानन घोडे, तेजस गजानन घोडे, विलास बापूराजे पिंगट (रा.बेल्हे), अविनाश हाडवळे, पप्पू औटी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. राजुरी) यांनी ते झोपेत असताना मारहाण करण्यास सुरुवात केली.

पप्पू औटी याने त्याच्या हातातील लोखंडी टॉमीने डावे हाताचे खांद्यावर मारले. अविनाश हाडवळे याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीच्या तोंडावर तसेच छातीवर मारून गंभीर दुखापत केली. वरील सर्वांनी बेकायदा गर्दी जमाव जमवून लाथांनी, लोखंडी टॉमी तसेच लोखंडी गजाने तोंडावर, छातीवर, डोळ्यावर, डोक्यात मारहाण गंभीर जखमी केले, अशी तक्रार शरद पिंगट यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

पोलिसांनी विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी पसार झाले असून, आळेफाटा ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचलं का ? 

पहा व्‍हिडिओ : कॉमेडी मध्ये एक्शन कॉमेडी आणणणारे हास्यसम्राट

 

Back to top button