रेंज हिल कार डेपो ते रेंज हिल स्टेशन दरम्यान मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी | पुढारी

रेंज हिल कार डेपो ते रेंज हिल स्टेशन दरम्यान मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महा मेट्रो प्रशासनाने मंगळवारी रेंज इन कार डेपो ते रेंज हिल मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे मेट्रोचा पुढचा टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यामुळे पुणेकरांना लवकरच मेट्रोची पूर्ण क्षमतेने सेवा उपलब्ध होणार आहे.

पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगपालिका मेट्रो स्थानक ते फुगेवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेच्या ट्रेनच्या मेन्टेनन्ससाठी रेंजहील येथे (कृषी महाविद्यालयाची मागील बाजूस) मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, रामवाडी ते वनाज या मार्गिकेसाठी कोथरूड हिल व्हिव पार्क (पूर्वीचा कचरा डेपो ) या जागेवर मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे.

आता रेंजहील मेट्रो कार डेपोची सर्व कामे पूर्ण झाली असून, याच ठिकाणी मेट्रो ने मंगळवारी रेंज हिल कार डेपो ते रेंज हिल स्थानक अशी मेट्रोची चाचणी केली. सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी ट्रेन रेंज हिल डेपो येथून निघाली व ५ वाजून ३५ मिनिटांनी ट्रेन सुमारे १ किलो मीटरचे अंतर पार करून ट्रेन रेंज हिल स्थानकापर्यंत आली. ट्रेनची चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार व वेळेवर पार पडली. तसेच, डेपोची जागा एकूण १२.१ हेक्टर आहे. या कार डेपोमध्ये मेट्रो प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रोला ‘नॉन फेअर बॉक्स’ उत्पन्न मिळणार आहे.

लवकरच भूमिगत चाचणी होणार…. 

येत्या काही आठवड्यात रेंज हिल डेपो ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक व सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे भूमिगत स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात येईल.

रेंज हिल मेट्रो कार डेपो चे काम पूर्ण झाले असून, घेण्यात आलेली मेट्रो चाचणी हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. येत्या काही दिवसांत मेट्रो ट्रेनची चाचणी शिवाजी नगर – सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानकापर्यंत घेण्यात येईल आणि येत्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड महानगपालिका मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक असा थेट प्रवास पुणेकरांना करता येईल.

–  डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो 

हेही वाचा  

Back to top button