पुणे: पीएमआरडीएफचा मेडिसिटी प्रकल्प कागदावरच | पुढारी

पुणे: पीएमआरडीएफचा मेडिसिटी प्रकल्प कागदावरच

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : सर्व महत्त्वाच्या वैद्यकीय सेवासुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा मेडिसिटी प्रकल्प पीएमआरडीएच्या वतीने उभारण्याची घोषणा झाली; मात्र अजूनही हा प्रकल्प कागदावरच आहे. हा प्रकल्प कधी मार्गी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जगभरात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले होते. लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला. भारतातही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. वैद्यकीय सुविधांमधील त्रुटी कमतरता त्या वेळी जाणवल्या. अनेकांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने जीव गमवावा लागला. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी त्या वेळी पीएमआरडीएच्या वतीने मेडिसिटी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी पालकमंत्री या नात्याने बैठकाही घेतल्या. तुळापूर, मरकळ येथील दीडशे एकरपेक्षा अधिक उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर हा प्रकल्प उभारण्याचे ठरविण्यात आले. रिंगरोड, कनेक्टिव्हिटी, रिव्हर साईड या बाबी त्यासाठी ध्यानात घेतल्या गेल्या.

मेडिसिटी प्रकल्पाद्वारे उच्च दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार यामागे होता. नामांकित मेडिकल इन्स्टिटयूट, मेडिकल रिसर्च इन्स्टिटयूट तसेच ब्रिच कैंडी, अपोलो यासारखी नामांकित रुग्णालये येथे याव्यात, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सारे पीएमआरडीएफने करावे, असेही ठरले.

तत्कालीन पालकमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या वतीने मेडिसिटी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी बैठकाही झाल्या; मात्र आता नव्याने काही आदेश नाहीत

रामदास जगताप, (जनसंपर्क अधिकारी)

या विषयावर बैठका होत गेल्याने प्रकल्प मार्गी लागेल तसेच वढू तुळापूरसारख्या ठिकाणी उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. धड धरल्यात नाही आणि धड सोडल्यात नाही, अशी या प्रकल्पाची अवस्था झाली आहे.

कोरोनासारख्या एखाद्या नवीन आजाराने धुमाकूळ घातल्यानंतरच शासनाला जाग येणार का? असा प्रश्न केला जात आहे. राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे सरकार हा प्रकल्प मार्गी लावणार का, याबाबत सर्वानाच उत्सुकता आहे.

Back to top button