पुणे; पुढारी वृत्तसेवा : मित्राला भेटण्यासाठी मुंबई येथे निघालेल्या एका 14 वर्षीय मुलीवर प्रवासासाठी पैसे देण्याच्या आमिषाने आठ ते नऊ जणांनी सलग दोन दिवस सामूहीक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व अज्ञात ठिकाणी नेऊन संबंधीत मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तब्बल दोन दिवस मुलीवर नराधमांनी अत्याचार केले आहेत.
पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसर्या दिवसी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानतंर पोलिसांच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीला वानवडी पोलिसांनी चंढीगड येथून ताब्यात घेतल्यानंतर तिने ही आपबिती सांगितली.
मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय २७, रा. वैदुवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (३२, रा. मंगळवार पेठ, जुना बाजार), रफिक मुर्तजा शेख (३२, रा.मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (२७, रा. कासेवाडी), प्रशांत सॅम्युयल गायकवाड (३२, रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (२९, रा. घोरपडी गाव), मोईब नईम खान (२४, रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (३६, रा. लोहीयानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.