गणेश आगमन, विसर्जन मिरवणूक काढू नका! गृहविभागाचे परिपत्रक | पुढारी

गणेश आगमन, विसर्जन मिरवणूक काढू नका! गृहविभागाचे परिपत्रक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

श्री गणेश आगमनाची तसेच विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये, असे परिपत्रक राज्याच्या गृहविभागाने काढले आहे. पर्यावरणाची हानी व जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू व लाल मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करावी, मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, असे आवाहन या परित्रकाद्वारे करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले.

कोरोनाचा विचार करता यावर्षीचा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत, भपकेबाज सजावट नसावी, श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती गणपतीकरिता दोन फुटांच्या मर्यादेत असावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी, लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या द़ृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे, घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नये, गर्दी करू नये, असेही या परिपत्रकात म्हटल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

Back to top button