राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत खेड तालुक्यातील ९ पैकी ७ गटात महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य होऊन भविष्यात विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या अनेकांना पंचायत समिती निवडणुकीचा आधार घ्यावा लागणार आहे.
सातकरस्थळ-वाडा एकमेव गटात सर्वसाधारण आरक्षण आले आहे. तर आंबेठाण-म्हाळुंगे या गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग आल्याने येथुन देखील पुरुष इच्छुकांना संधी आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला ताई पानसरे यांच्या विभागलेल्या दोन्ही गटात महिला आरक्षण आले असल्याने त्यांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत खेड तालुक्यातील गटात जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे : नायफड – आवदर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वाडा – सातकरस्थळ : सर्वसाधरण पुरूष, रेटवडी – कनेरसर : सर्वसाधरण महिला, पिंपळगाव – काळूस : सर्वसाधारण महिला, शिरोली – कडूस : सर्वसाधरण महिला, पाईट – कुरकुंडी : सर्वसाधरण महिला, आंबेठाण – महाळुंगे : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, नाणेकरवाडी – मेदनकरवाडी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कुरुळी – मरकळ : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
सातकरस्थळ-वाडा हा एकमेव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाला असून येथे पक्षीय उमेदवारी मिळवताना आणि प्रत्यक्ष निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे बाबाजी काळे आणि तनुजाताई घनवट यांच्या पूर्वीच्या गटातील अर्धा अर्धा भाग मिळून सातकरस्थळ-वाडा गट तयार झाला आहे. सौ. घनवट यांचे दिर संजुशेठ घनवट, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख येथूनच लढण्याच्या तयारीत आहेत.
याशिवाय या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मानणारा वर्गही मोठा आहे. राष्ट्रवादी कडून तगडा उमेदवार येऊ शकतो. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याबरोबर पुढच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असणाऱ्या बाबाजी काळे, अतुल देशमुख यांच्या दृष्टीने हा मतदार संघ प्रतिष्ठेचा होणार आहे. आंबेठाण-म्हाळुंगे गटात ओबीसी आरक्षण आले आहे. भाजपचे शरद बुट्टे पाटील यांना या किंवा पत्नीच्या माध्यमातून मूळ गटात संधी आहे.