West Bengal SSC scam : ती 'ब्‍लॅक' डायरी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी; काय आहे शिक्षक भरती घोटाळ्याशी कनेक्‍शन? | पुढारी

West Bengal SSC scam : ती 'ब्‍लॅक' डायरी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी; काय आहे शिक्षक भरती घोटाळ्याशी कनेक्‍शन?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई केल्‍याने पश्‍चिम बंगालमध्‍ये खळबळ माजली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ४७ कोटींची रोकड आणि ४ कोटीचे सोन्‍याचे दागिने जप्‍त करण्‍यात आले आहेत. पश्‍चिम बंगालचे विद्यमान व्यापार व वाणिज्यमंत्री पार्थ चटर्जी आणि त्यांची निकटवर्तीय अभिनेत्री अर्पिता मुखर्जींच्‍या प्‍लॅटवर सापडलेल्‍या रोकड आणि सोने आणि ४० पानांच्‍या ब्‍लॅक डायरीतील माहितीमुळे ‘ईडी’चे अधिकारीही अवाक झाले आहेत जाणून घेवूया, अभिनेत्री अर्पिता मुखर्जी आणि तिच्‍या फ्‍लॅटमध्‍ये सापडलेल्‍या ब्‍लॅक डायरीविषयी…

West Bengal SSC scam : कोण आहे अभिनेत्री अर्पिता मुखर्जी?

मध्‍यमवर्गीय कुटुंबातील अर्पिता मुखर्जी हिने मॉडेल म्‍हणून आपल्‍या करिअरला सुरुवात केली. कोलकातामधील बेलघोरिया येथे आईसोबत राहणार्‍या अर्पिताने २००८ ते २०१४ या काळात बंगाली, ओडिशा आणि तामिळ चित्रपटात अभिनयही केला होता. विविध चित्रपटात तिने सहायक अभिनेत्री म्‍हणून काम केले. पश्‍चिम बंगालमधील सुपरस्‍ाटर प्रोसेनजीत चटर्जी यांच्‍या ‘मामा भगने’ मध्‍येही तिने काम केले आहे. कोलकातामधील सर्वात मोठाउत्‍सव असणार्‍या दुर्वा उत्‍सव समितीची स्‍टार प्रचारक म्‍हणूनही तिने काम पाहिले आहे.

West Bengal SSC scam :  मंत्री पार्थ चटर्जी यांच्‍या संपर्कात अर्पिता कशी आली?

मंत्री पार्थ चटर्जी हे पश्‍चिम बंगालमधील दुर्गा पूजा उत्‍सवासाठी प्रसिद्‍ध असणार्‍या कटला उद्‍यन संघ दुर्गा पूजा समितीचे काम पाहतात. कोलकातामधील सर्वात मोठा उत्‍सव असणार्‍या दुर्वा उत्‍सव समितीची स्‍टार प्रचारक म्‍हणून काम करताना अर्पिता ही पार्थ चटर्जी यांच्‍या संपर्कात आली. यानंतर दोघांची ओळख झाली. या दोघांचा एक फोटो बंगाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते शुभेंदु अधिकारी यांनी ट्वीट केला आहे. यामध्‍ये मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्‍यास पार्थ चटर्जी आणि अर्पित दिसत आहेत. शुभेंदू यांनी आणखी एक व्‍हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, यामध्‍ये ममता बॅनर्जी या अर्पितावर स्‍तुतिसुमने उधळताना दिसत आहेत.

ईडीकडून आतापर्यंत कोट्यवधीची रोकड जप्‍त

पश्‍चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी बुधवारी सकाळी ईडीच्‍या पथकांनी अर्पिताच्‍या चार फ्‍लॅटवर छापे टाकले. बेलघरिया येथील फ्‍लॅटचे कुलूप तोडत धडक कारवाई केली. यावेळी या फ्‍लॅटमध्‍ये तब्‍बल २१ कोटी रुपयांची रोकड मिळाली होती. या कारवाईवेळी ईडीच्‍या अधिकार्‍यांच्‍या हाती एक ब्‍लॅक डायरी लागली आहे. ईडीने सोमवार २५ जुलै रोजी कोलकाता उच्‍च न्‍यायालयात यासंदर्भातील माहिती दिली.

‘त्‍या’ ब्‍लॅक डायरीमध्‍ये घोटाळ्यातील अनेक खुलासे, कोडवर्डही

४० पानांच्‍या ब्‍लॅक डायरीमध्‍ये शिक्षक भरती घोटाळ्यातील अनेक बाबी समोर आल्‍या आहेत. ईडीच्‍या सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ४० पानांच्‍या डायरीमध्‍ये १६ पानांमध्‍ये या घोटाळ्यातील आर्थिक व्‍यवहारात कोणाकडून किती पैसे घेतले याची माहिती आहे. तसेच अनेक गोष्‍टींचा उल्‍लेख हा कोडवर्डमध्‍ये आहे. तसेच शिक्षक भरतीमधील गुणवत्ता यादीत आलेल्‍या
कोणत्‍या उमेदवारांना स्‍थान देयचे आहे. यामध्‍ये परीक्षेत नापास झालेल्‍या उमेदवारांच्‍या नावाचाही उल्‍लेख आहे. मात्र त्‍याचे गुण वाढवून त्‍यांना गुणवत्ता यादीत स्‍थान देण्‍यात आल्‍याचेही यामध्‍ये नमूद केले आहे. कोणत्‍या उमेदवाराने किती पैसे दिले या सर्वबाबींचा उल्‍लेख यामध्‍ये आहे. तसेच शिक्षण भरतीसाठी पैसे घेतलेल्‍या एजेंटांच्‍या नावाचाही या डायरीत उल्‍लेख आहे. या ब्‍लॅक डायरीबरोबरच शिक्षण विभागाच्‍या संबधित काही कागदपत्रे हाती लागली असून, या कागदपत्रांमध्‍ये पाच लाखांची रोकडही सापडली आहे. या सर्व पुराव्‍यावरुन पश्‍चिम बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्यात पार्थ चटर्जी यांचा थेट सहभाग होता असे ईडीने न्‍यायालयात स्‍पष्‍ट केले आहे.

शिक्षक भरती घोटाळा कसा उघडकीस आला?

२०१६ मध्‍ये पश्‍चिम बंगालमध्‍ये स्‍कूल सेवा आयोगाच्‍या (एसएससी) वतीने शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेण्‍यात आली. या निवड प्रक्रियेचा निकाल २०१७ मध्‍ये लागला. निकालात सिलीगुडीच्‍या बबीता सरकार हिने प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर आयोगाने ही निवड यादीच रद्‍द केली होती. यानंतरच्‍या यादीत बबीता पेक्षाही १६ गुण कमी असणार्‍या अंकिता अधिकारी ही गुणवता यादीत प्रथम आली. याविरोधात बबीता सरकार आणि अन्‍य परीक्षार्थींनी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्‍यात यावा, असे आदेश उच्‍च न्‍यायालयाने दिले. याप्रकरणी सीबीआयने पार्थ चटर्जी यांची चौकशी केली होती. आता याप्रकरणी ईडीने धडक कारवाई करत पार्थ चटर्जी यांच्‍यासह अर्पिता मुखर्जी हिला अटक केली आहे. याप्रकरणी आणखी धक्‍कादायक खुलासे होतील, हा घोटाळा १०० कोटी रुपयांचा असल्‍याचा संशय ईडीने व्‍यक्‍त केला आहे.

‘ईडी’ची पुराव्‍याबाबत न्‍यायालयात माहिती

रिपोर्टनुसार, अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल सूर्यप्रकाश व्‍ही राजू यांनी न्‍यायालयात सांगितले की, “अर्पिता मुखर्जीच्‍या फ्‍लॅटमधून अनेक महत्त्‍वपूर्ण कागदपत्रे जप्‍त करण्‍यात आली आहे. पार्थ चटर्जी आणि अर्पिता हेमोबाईल फोनच्‍या माध्‍यमातून संपर्कात असत. या प्रकरणाचा सखोल तपासासाठी दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करणे आवश्‍यक आहे.”

हेही वाचा : 

 

Back to top button