नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील ११ वर्षीय मुलीवर तब्बल ९ जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने राज्याची उपराजधानी हादरली आहे. या सर्वच्या सर्व ९ नराधमांना पोलिसांनी गजाआड केले आहे. पैशांचे आमिष दाखवून नऊ जणांनी ११वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची ही दुर्देवी घटना आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे ही घटना उघडकीस आली आहे.
उमरेड पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली आहे. रोशन सदाशिव कारगाकर (वय २९), गजानन दामोदर मुरस्कर (वय ४०), प्रेमदास जागोबा गाठीबांधे (वय ३८), गोविंदा गुलाब नटे (वय २२, रा. रानबोरी, कुही), सौरभ ऊर्फ करण उत्तम रिठे (वय २२), नीतेश अरुण फुकट (वय ३०), राकेश शंकर महाकाळकर (वय २४), प्रद्युम्न दिलीप करुटकर (वय २२) व निखिल ऊर्फ पिंकू विनायक नरुले (वय २४) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या अंगठीसाठी शुभम दमडू (वय २५) याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात उमरेड पोलिसांनी अकोला रेल्वेस्थानकावरून रोशन व त्याचा साथीदार बादल या दोघांना अटक केली. त्यांची पोलिस कोठडी घेतली. कोठडीदरम्यान रोशनची कसून चौकशी करण्यात आली. या दरम्यान त्याने मुलीवर साथीदारांच्या मदतीने सामूहिक अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली. तिने रोशन व त्याच्या साथीदारांनी अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नऊजणांना अटक केली.
या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी आठवीच्या वर्गात शिकते. ती रोशनला ओळखते. १९ जूनला दुपारी रोशन आणि गजानन मुलीच्या घरी आले. 'काम आहे, तू आमच्यासोबत चल,' असे रोशन तिला म्हणाला. मुलीला घेऊन तो स्वत:च्या घरी गेला. तेथे आळीपाळीने दोघांनी मुलीवर अत्याचार केला. 'अत्याचाराबाबत सांगितल्यास तुला ठार मारू,' अशी धमकी देऊन तिला ३०० रुपये दिले. त्यानंतर रोशन हा वेळावेळी मुलीला घरी बोलायचा. तिच्यावर अत्याचार करायचा. काही दिवसांपूर्वी गजानन हा मुलीला भेटला. रोशनने तुझ्यावर अत्याचार केल्याची माहिती तुझ्या नातेवाइकांना देईल, अशी धमकी देऊन गजानन व प्रेमदास हे दोघे तिला घेऊन रोशनच्या घरी गेले. तिथे तिचे शारीरिक शोषण केले. त्यानंतर अन्य सहा जणांना बोलविले. त्यांनी मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांची ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
हे ही वाचा :