आता १७ वर्षे पार केल्यानंतर युवक करु शकतात मतदान ओळखपत्रासाठी अर्ज | पुढारी

आता १७ वर्षे पार केल्यानंतर युवक करु शकतात मतदान ओळखपत्रासाठी अर्ज

 नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वयाची सतरा वर्षे उलटल्यानंतर युवावर्ग मतदान ओळखपत्रासाठी आगाऊ अर्ज करु शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तशी मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी सर्व राज्यांना दिले आहेत. याआधी 18 वर्ष उलटल्यानंतरच युवकांना मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करता येत असे.

17 वर्ष उलटलेले युवक मतदान ओळखपत्रासाठी वर्षातून तीनदा म्हणजे 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी अर्ज करु शकतात. यासाठी पूर्वीप्रमाणे 1 जानेवारीची वाट पहावी लागणार नाही. विशेष म्हणजे युवा वर्गाकडून प्राप्त होणारे अर्ज लक्षात घेऊन दर तीन महिन्यांनी मतदारयादी अपडेट केली जाणार आहे. प्रक्रियेदरम्यान ज्या युवकांचे वय 18 वर्षाच्या पुढे जाईल, त्यांचे नाव मतदान यादीत सामील होईल. नोंदणी झाल्यानंतर युवकांना आयोगाकडून मतदान ओळखपत्र दिले जाईल. दरम्यान आधारकार्डची मतदान ओळखपत्राशी जोडणी करण्याचे काम अनेक राज्यांत सुरु झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button