पुणे : एफआरपीच्या नावाखाली साखरेचा हवा वाढीव कोटा | पुढारी

पुणे : एफआरपीच्या नावाखाली साखरेचा हवा वाढीव कोटा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सणासुदीमुळे साखरेला मागणी वाढली असून कारखान्यांकडील ऑगस्टसाठीचा साखरेचा कोटा संपत चाललेला आहे. या स्थितीत एफआरपीची रक्कम देण्याकरिता वाढीव कोटा देण्याची मागणी साखर आयुक्तालयाकडे कारखान्यांकडून सुरु केलेली आहे.

जेणेकरुन कारखान्यांच्या प्रस्तावावर आयुक्तालयाकडून जाणार्‍या अहवालावर केंद्राकडून निर्णय होण्यासाठी कारखान्यांकडून प्रयत्न सुरु झालेले आहे.

गतवर्षीच्या २०२०-२१ या ऊस गाळप हंगामातील १५ ऑगस्ट अखेरच्या अहवालानुसार उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीचे (एफआरपी) शेतकर्‍यांना देय रक्कमेपैकी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ३० हजार ५३४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत एफआरपीची ३७३.३३ कोटी (१.२१ टक्के) रुपये ४८ कारखान्यांकडून शेतकर्‍यांना देणे बाकी आहे. त्यापैकी कारखान्यांकडून अशी थकित एफआरपीची रक्कम देण्यासाठी साखर विक्रीचा वाढीव कोटा देण्याची मागणी सुरु झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.

अपेक्षित साखरेचा कोटा

याबाबत कारखान्यांकडे उपलब्ध साखर, ऑगस्ट महिन्यासाठी आलेल्या कोट्यातील झालेली साखर विक्री आणि थकीत एफआरपीची रक्कम अशी पडताळणी करण्यात येत आहे.

त्यानंतर पुढील महिन्याचा येणारा अपेक्षित साखरेचा कोटा आणि खरोखरच देय एफआरपी रक्कम देण्यासाठी वाढीव कोट्याची आवश्यकता आहे का? हे तपासूनच योग्य ती माहिती केंद्र सरकारला कळविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाढीव कोटा दिल्यानंतर जादा साखरेची आवक होऊन सध्याचे भावही कमी होऊ शकतात. या पार्श्वभुमीवर पुढील आठवड्यात थकीत एफआरपीची रक्कम देणे बाकी असलेले किती कारखाने प्रस्ताव दाखल करणार हे सुध्दा स्पष्ट होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचलंत का? 

पाहा : साताऱ्याच्या रोहित ने चित्तथरारक रॅपलिंग करून सर केला शितकडा धबधबा 

Back to top button