काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आले पण ठराविक पदाधिकार्‍यांच्या चौकटीतच अडकले | पुढारी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आले पण ठराविक पदाधिकार्‍यांच्या चौकटीतच अडकले

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुण्यात आलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काही ठराविक पदाधिकार्‍यांच्या चौकटीतच अडकले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांशी साधी चर्चाही करता न आल्याने जेष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला.

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी पुणे दौर्‍यावर आले होते. त्यांच्या या दौर्‍यात ब्लॉक अध्यक्षांसह प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. त्यानुसार दुपारी पटोले काँग्रेस भवनात पोहचले. मात्र, त्यांनी ब्लॉक अध्यक्षांशी स्वतंत्र चर्चा न करता सर्वानांच एकत्र बोलविले.

त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळांचे वातावरण होते. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने नक्की काय चालले आहे हे समजायला मार्ग नव्हता. मोजक्या काही ब्लॉक अध्यक्षांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चेची औपचारिकता प्रदेशाध्यक्षांनी पुर्ण केली, त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

याविषयी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दै. पुढारीशी बोलताना त्यांचा भावना व्यक्त केल्या. काँग्रेसमधील ठराविक सात आठ आणि ज्यांनी विविध पदे भोगली आहेत ,अशाच पदाधिकार्‍यांच्या चौकटीत प्रदेशाध्यक्ष अडकले. अगदी त्यांच्या गाडीतील जागा काही मंडळी जागा सोडायला तयार नव्हते.

काँग्रेस भवनातही हीच मंडळी बंद खोलीत चर्चा करायला पुढे असतात. अगदी मुंबईत प्रदेशाध्यक्षांकडे याच मंडळींचा राबता असतो.

त्यामुळे सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे नक्की पोहचायचे तरी कसा असा प्रश्नच काही जेष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

संघटनेतील बदलांबाबत पहायला मिळेल

पुणे शहर संघटनात्मक बदलाबाबत पटोले यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आपल्याला ते पहायला मिळेल असे उत्तर देत नव्या शहराध्यक्ष निवडीचे संकेत दिले.

तसेच ही पक्षातंर्गत बाब असून सध्या आमच्यापुढे जनतेचे प्रश्न असल्याची सारवासारवही त्यांनी केली.

निरीक्षक पाठवून आढावा घेणार

ब्लॉक़ अध्यक्षांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रदेश पातळीवरून निरीक्षक पाठवून कामांचा आढावा घेतला जाईल.

त्यानंतर कोणाचा सन्मान करायचा आणि कोणाला नारळ द्यायचा हे ठरवू असेही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी स्पष्ट केले.

Back to top button