वर्षभर घ्या अळूचे पीक आणि भरघोस उत्पादन मिळवा | पुढारी

वर्षभर घ्या अळूचे पीक आणि भरघोस उत्पादन मिळवा

- सत्यजित दुर्वेकर

खरिपातील लागवड जून-जुलै महिन्यात करतात. पाण्याची सोय असल्यास वर्षभर अळूचे पीक घेता येते. अळूची लागवड करण्यासाठी मातृकंद किंवा बगल कंद वापरले जातात. लागवडीसाठी बगलकंदाचा वापर केल्यास उत्पादन जास्त येते. लागवडीसाठी कंदाचे वजन साधारणपणे 45 ते 50 ग्रॅम असावे. कंदासाठी अळूची लागवड करायची झाल्यास दोन ओळीतील अंतर 90 सेमी ठेवावे.

लागवडीसाठी सरी वरंबा, सपाट वाफे किंवा गादी वाफा पद्धतीचा अवलंब करावा. लागवड करताना कंद 8 ते 10 सेमी खोलीवर लावावेत आणि मातीने चांगले झाकावेत. महाराष्ट्रात काळ्या देठाचा लहान ते मध्यम पानांचा अळू चांगला समजला जातो. वडीच्या अळूसाठी महाराष्ट्रात कोकण हरितपर्णी, दापोली-1 या जाती वापरल्या जातात. अळूच्या पिकाला हेक्टरी 100 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी द्यावी.

ओलावा जास्त तेवढ्या प्रमाणात अळूच्या पानांचे उत्पादन जास्त मिळते. म्हणून या पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. अळू पिकावर पाने कुरतडणारी अळी आणि मावा किडीचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या नियंत्रणासाठी थायोडेन 0.2 टक्के प्रमाणे किंवा मेलॅथिऑन 0.1 टक्के प्रमाणे फवारणी करावी. हुमणी किंवा वाळवीचा उपद्रव आढळल्यास क्लेरोपायरीफॉस कीटकनाशकाचा जमिनीतून वापर करावा. काही वेळा करपा रोगाचा पावसाळ्यात प्रादुर्भाव होतो, त्यासाठी रोगग्रस्त पाने काढून टाकावी आणि 1 टक्के बोर्डो मिश्रण फवारावे.

अळूची पाने लागवडीनंतर 1.5 ते 2 महिन्यांत काढायला येतात. पूर्ण वाढलेली पाने जमिनीलगत देठासह कापून, गड्ड्या बांधून विक्रीला पाठवावी. पहिल्या वेळी पाने काढल्यानंतर पुन्हा 15 ते 18 दिवसांच्या अंतराने पाने काढणीस तयार होतात. एकदा केेलेल्या लागवडीपासून 1.5 ते 2 वर्षे पाने मिळत राहतात. अळूचे कंदासाठी लावलेले पीक 7-8 महिन्यांत तयार होते. पाने पिवळी पडून सुकू लागतात तेव्हा कुदळीने खणून कंद काढता येतात. काढणीनंतर हे कंद 5-6 दिवस सावलीत पसरून वाळवावेत. योग्य व्यवस्थापन केल्यास वडीसाठी अळूचे सुमारे 4 ते 5 टन दर हेक्टरी, हिरवी पाने आणि कंदासाठी लागवण्यात येणार्‍या जातींपासून सुमारे 6 ते 7 टन दर हेक्टरी कंद एवढे उत्पादन मिळते.

Back to top button