कोंढव्यात २१ लाखांचे 'मेफेड्रॉन' जप्त एकास अटक | पुढारी

कोंढव्यात २१ लाखांचे 'मेफेड्रॉन' जप्त एकास अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा :

कोंढव्यात बेकायदेशिररीत्या मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ( २) ने एकाएकास अटक केली. त्याच्याकडून २० लाख ५२ हजारांचे १७१ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहे. राहुल हितेश्वर नाथ ( वय २४, रा. शिवानेरी नगर, मुळरा. गुवाहटी, आसाम) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २) पथकातील अमंलदार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत हाेते.  सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पथकातील अमंलदार आझीम शेख यांना शिवनेरीनगर येथे बंदी असलेल्या मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिशा खेवलकर यांच्या पथकाने छापा टाकून राहुल नाथ याला ताब्यात घेतले.

राहुल नाथकडून महागडा मोबाईल, ३१ हजार ५०० रूपयांची रोकड, दुचाकी आणि २० लाख ५२ हजारांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. त्याच्याकडून यावेळी २१ लाख ५८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक ( २) ने केली.

आमच्या पथकाने एकाला कोंढव्या परिसरातून अटक केली असून, तो गेल्या सात ते आठ वर्षापासून कोंढवा परिसरात राहण्यास आहे. त्याच्याकडून २० लाख २५ हजारांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. त्याने हा अंमली पदार्थ बाहेरच्या शहरातून आणल्याचे सांगत आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. त्यांचे नेमके कोण ग्राहक होते? याचीही माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
– प्रकाश खांडेकर, वरिष्ठ निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक 2, गुन्हे शाखा.

हेही वाचलंत का? 

Back to top button