'सेव्ह आरे'चा पुन्हा नारा : मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक | पुढारी

'सेव्ह आरे'चा पुन्हा नारा : मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

जोगेश्वरी: पुढारी वृत्तसेवा : सेव्ह आरे जिंदाबाद… हमरा जंगल जिंदाबाद…आरे हमारी जाण है… आरे हमारी पहचान है… अशा घोषणा देत शेकडो पर्यावरण प्रेमींनी आरे पिकनिक पॉईंट परिसर आज (दि.३) दणाणून सोडला. पुन्हा एकदा आरे पर्यावरणप्रेमी यांच्यासह आदिवासी बांधवांनी आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी साडेअकरा वाजता आम आदमी पार्टीच्या वतीने मेट्रो कारशेड ठिकाणी हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी आरे पोलिसांचा चोख बंदोबस्त आंदोलनस्थळी होता. गोरेगाव आरे मेट्रो कारशेडच्या निमित्ताने पुन्हा एकदा आरेतील जंगलावर कुऱ्हाड चालवण्याची तयारी शिंदे सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, शिंदे सरकारच्या या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी संघटना आणि पर्यावरणप्रेमी, आदिवासी नागरिक एकवटले आहेत.

आरेला कारे करणारच, असे म्हणत सकाळी ११ वाजता आरे येथील पिकनिक स्पॉटवर आंदोलक जमले होते. या आंदोलनात शिवसेना, आम आदमी पार्टी, आदिवासी बांधव, वॉचडॉग फाऊंडेशन, अनेक स्वयंसेवी संस्था, तीनशे ते चारशे पर्यावरणप्रेमी आंदोलनात सहभागी झाले होते. जेव्हा जेव्हा पर्यावरणावर संकट येईल, तेव्हा-तेव्हा ‘आम्ही परत येऊ’ असा इशारा पर्यावरणप्रेमी यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button