परभणी : डॉ. आंबेडकर पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण हटवा; ऑल इंडिया पँथर सेना छेडणार आंदोलन | पुढारी

परभणी : डॉ. आंबेडकर पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण हटवा; ऑल इंडिया पँथर सेना छेडणार आंदोलन

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील पुतळ्यासमोरील वाढते अतिक्रमण नगर पालिका प्रशासनाने तत्काळ हटवावे आणि पुतळ्या मागील जागा वापरात आणावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रमक झाली आहे. ऑल इंडिया पॅंथर सेना लवकरच जन आंदोलन करणार असल्याचे निवेदन पालिकेला देण्यात आले आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील वाढते अतिक्रमण पुतळ्याच्या सुशोभीकरणाला बाधक ठरत आहे. पुतळ्याभोवती चोहोबाजूंनी छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पुतळ्याचे पवित्र नष्ट होत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. नगर पालिका प्रशासनाने याबाबत तात्काळ उपाययोजना करून अतिक्रमणे हटवावीत. तसेच पुतळ्या मागील जागा वापरात आणावी अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे गंगाखेड तालुकाध्यक्ष विकास रोडे, रोहिदास लांडगे, संतोष हनवते, अविनाश जगतकर, अशोक व्हावळे, कैलास झुंजारे आदींनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात केली आहे.

७ जुलैला जनआंदोलनाचा इशारा

नगरपालिका प्रशासनाने ६ जुलैपर्यंत डॉ आंबेडकर पुतळ्याशेजारील अतिक्रमण न हटविल्यास ७ जुलै रोजी जन आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेने दिला आहे. परिणामी, पालिका प्रशासन ६ जुलैपर्यंत पुतळ्याशेजारी अतिक्रमण हटवते का ? याकडे आंबेडकरी जनतेचे लक्ष लागले आहे.

संरक्षण भिंत वाढविण्याचा केवळ ठराव, अंमलबजावणी मात्र नाही

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील जागेवर संरक्षण भिंत वाढविण्याचा ठराव विसर्जित झालेल्या पालिका सभागृहाने पहिल्याच बैठकीत घेतला होता. मात्र, मागील पाच वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, पालिकेत आंबेडकरी चळवळीचे बहुतांश नगरसेवक निवडून येऊनही संबंधित लोकप्रतिनिधी अथवा सभागृहाने आंबेडकर पुतळ्यामागील जागा अधिग्रहित करून संरक्षण भिंत वाढवलेली नाही. ऑल इंडिया पॅंथर सेनेने पुतळ्या मागील जागा वाढवून घेण्याची मागणी नव्याने केल्याने पालिका प्रशासन आता तरी या मागणीकडे लक्ष देईल का? याकडेही लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button