विधानसभा अध्यक्षपदी निवड हा माझा सर्वोच्च बहुमान : ॲड. राहुल नार्वेकर | पुढारी

विधानसभा अध्यक्षपदी निवड हा माझा सर्वोच्च बहुमान : ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात टिळक-गोखले-आंबेडकर-नाना पाटील-सावरकर यासारख्या महान देशभक्तांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली. हा मी माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीतील सर्वोच्च बहुमान समजतो, अशा शब्दांत विधानसभेचे नुतन अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानसभा अध्यक्षपदी १६४ मतांनी निवड झाल्यानंतर ते अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते.

लोकशाहीतील हे महत्त्‍वाचे पद मी गांभीर्याने आणि न्यायबुध्दीने सांभाळीन

यावेळी राहुल नार्वेकर म्‍हणाले की, भारतीय स्वातंत्र्यलढयासाठी त्याग आणि बलिदान दिलेल्या सर्व आदरणीय नेत्यांना आणि शूरवीरांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सभागृहाचे आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर अशा सर्व महात्म्यांना मी या आसनावरुन नतमस्तक होत वंदन करतो. लोकशाहीतील हे महत्त्‍वाचे पद मी गांभीर्याने आणि न्यायबुध्दीने सांभाळीन, अशी ग्वाही देतो.

आपली संसदीय लोकशाही सर्व प्रकारच्या राजकीय विचारछटांना स्थान देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. जनताजनार्दन हा आपल्या मताधिकाराद्वारे सरकार निवडून आणतो किंवा आधी निवडलेले सरकार पुढल्यावेळी पराभूत देखील करतो. जनादेशाचा आदर राखणे आणि संसदीय सभ्याचार जपला जाणे आवश्यक आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

२४ तास उपलब्ध असलेला विधानसभा अध्यक्ष आता लाभणार

विधानसभेची ही पवित्र वास्तू मला जनतेने निवडून दिलेल्या कुलाबा मतदारसंघातच येते. विधानसभा अध्यक्ष हे विधानसभा ज्या मतदारसंघात येते, त्याच मतदारसंघाचे आमदार हा एक दुर्लभ असा योग माझ्या बाबतीत आपणा सर्वांमुळे घडून आला आहे. अर्थात त्यामुळे सगळ्यांना सत्र काळात आणि नि:सत्रकाळातही २४ तास उपलब्ध असलेला विधानसभा अध्यक्ष आता लाभणार आहे. विरोधीपक्षातील आमचे सर्व मित्र त्याचे निश्चितच स्वागत करतील, अशी मला आशा आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ हे राज्यातील १३ कोटी जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक आहे. आपणा सारख्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत या इच्छा-आकांक्षा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहात मांडल्या जाणे आणि त्यानुसार निर्णयप्रक्रियेचे चक्र गतीमान राहणे आवश्यक आहे. जेव्हा सभागृहाचा वेळ गोंधळामुळे वाया जातो तेव्हा असे वर्तन म्हणजे एक प्रकारे जनताजनार्दनाच्या भावभावनांची आणि अपेक्षांची प्रतारणा आहे, हे लक्षात घेतले जावे. त्यादृष्टिने यापुढील काळात सभागृह कामकाजाचा क्षण आणि क्षण लोकहिताच्या कारणासाठी, निर्णयाभिमुख चर्चेसाठी, विकासाभिमुख नियोजनासाठी आणि समाजातील अंतिम घटकांच्या– शोषित वंचितांच्या उध्दारासाठी खर्ची पडेल, अशी ग्वाही मी देतो.

कायदे करणे हे कायदेमंडळाचे महत्वाचे कार्य आहे. विधेयकांवर दोन्ही बाजूने सांगोपांग चर्चा होऊन येणारा नवीन कायदा अधिकाधिक परिपूर्ण असावा अशी अपेक्षा असते. दुर्दैवाने महत्वाची विधेयके सुध्दा चर्चेविना संमत होणे, सभागृहातील दोन्ही बाजूंसाठी आणि विशेषत: लोकहिताचे वैशिष्टयपूर्ण कायदे राज्याबरोबरच देशालाही देणाऱ्या आपल्या विधानमंडळासाठी, भूषणावह नाही. यासंदर्भात येत्या काळात परिस्थिती निश्चितच सुधारलेली असेल, त्यादृष्टीने काही व्यवस्था आपण तयार करु, अशी मी आपणा सर्वांना खात्री देतो.

सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष स्थानापन्न

मी आणखी एका दृष्टीने भाग्यवान विधानसभा अध्यक्ष ठरणार आहे. त्याचे कारण याच सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष स्थानापन्न आहेत. मागील विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, दिलीप वळसे-पाटील, नाना पटोले. तर याच विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष राहिलेले उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे कार्यकारी असल्यामुळे चौथे असे चार माजी अनुभवी अध्यक्ष मला मार्गदर्शन करण्यासाठी याच सभागृहात तत्पर असणार आहेत, असेही ते  म्‍हाणाले

आपल्या सभागृहाला दिग्गज अध्यक्षांची अतिशय तेजस्वी आणि प्रेरक परंपरा लाभली आहे. आदरणीय गणेश वासुदेव मावळणकर, कुंदनलाल फिरोदिया, दत्तात्रेय कुंटे, सयाजी सिलम, बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, शिवराज पाटील अशी ही मोठी परंपरा आपल्या समोर आहे. या मान्यवरांनी आपल्या संसदीय लोकशाहीचा सन्मान उंचावला आहे, असेही नार्वेकर म्‍हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button