पंजशीर : जिथं तालिबान्यांची डाळ कधीच शिजली नाही! परदेशी फौजाही गार पडल्या - पुढारी

पंजशीर : जिथं तालिबान्यांची डाळ कधीच शिजली नाही! परदेशी फौजाही गार पडल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजशीर : ज्या अमेरिकनं तालिबान्यांचा नायनाट करण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून जीवाचे रान केलं त्याच तालिबान्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतलं आहे.

अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या शंभर एक दिवसात तालिबानने स्थानिक अफगाण सुरक्षेला भगदाड पाडून शहरांवर शहरे काबीज केली. त्यांचा मोर्चा काबूलपर्यंत पोहोचल्यानंतर आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी विमानतळावर केलेल्या प्रयत्नांनी जगाला त्याची दाहकता कळाली.

देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अश्रफ गणी यांनी चार गाड्या पैसा भरून आणि हेलिकॉप्टरसह देशातून कलटी मारली. त्यांना संयुक्त अरब अमिरातीने आश्रय दिला. अश्रफ गणी देशातून परागंदा झाल्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष घोषित केले.

पंचशीर व्हॅली अचानक केंद्रस्थानी

काबूलमधील हाहाकार जगाने पाहिल्यानंतर आता पंचशीर व्हॅली अचानक केंद्रस्थानी आली आहे. काबूलच्या उत्तरेला असलेल्या पंजशीर व्हॅलीमध्ये तालिबानला अस्मान दाखवण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्याला नॅशनल रेसिस्टंट्स फ्रंट असेही म्हटले जात आहे.
या फ्रंटमध्ये अहमद मसूद, अमरुल्लाह सालेह, बिसमिल्लाह खान मोहम्मदी आदी नेत्यांचा समावेश आहे.

पंजशीर व्हॅली हा शेवटचा अफगाणिस्तानमधील प्रांत आहे. आजवर तालिबान विरोधात सामर्थ्याने उतरला आहे. ताजिकिस्तानमधील अफगाण राजदूत झहीर अघबर म्हणाले की, हा प्रांत तालिबान विरोधात लढण्यासाठी नॅशनल फ्रंटसाठी बालेकिल्ला असेल. अफगाणिस्तानमध्ये स्वत:ला काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष घोषित केलेल्या अमरुल्लाह सालेह हे यांच प्रांतातील आहेत.

याच प्रांतामध्ये तालिबान्यांचा पाडाव करण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे.

पंचशीर व्हॅलीबाबत १० मुद्दे समजावून घेऊ

  • पंचशील व्हॅली काबूलच्या उत्तरेला हिंद कुश पर्वतामध्ये वसली आहे. या प्रांतावर सोव्हीएत युनियनने १९८० आणि १९९० च्या दशकात तालिबानकडून चाल केली, पण त्यांना कडाडून प्रतिकार झाला.
  • अफगाणचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचा जन्मही याच पंचशील व्हॅलीमध्ये झाला असून त्यांनी याच भागात प्रशिक्षण घेतले आहे.
  • ही व्हॅली नेहमीच संघर्षाची प्रतीक राहिली आहे. कोणत्याही फौजेला या प्रांतावर विजय मिळवता आलेला नाही. विदेशी फौजांसह तालिबानने सुद्धा या ठिकाणी नांगी टाकली आहे.
  • पंचशीर व्हॅलीचा अर्थ पाच सिंहाची व्हॅली असा अर्त ध्वनित होतो. १० व्या शतकात होऊन गेलेल्या पाच भावांच्या पराक्रमाचा दाखला देण्यासाठी हे नाव पडल्याचे बोलले जाते. त्या कालखंडात पाच भावांनी पूर परिस्थितीचे व्यवस्थापन केलेच, पण त्यांनी गझनीच्या मोहम्मदासाठी धरणही बांधून दिले.
  • या व्हॅलीमध्ये एक लाख लोक राहतात. त्यामधील बहुतांश ताजीक आहेत.
  • सध्या ज्या नॅशनल रेसिस्टंट्स फ्रंटची अफगाणिस्तानमध्ये चर्चा होत आहे. त्यामध्ये अहमद मसूद, अमरुल्लाह सालेह, बिस्मिल्लाह मोहम्मदी पंजशीर रेसिस्टंट्सचे प्रमुख नेते आहेत.
  • त्यांना नव्याने स्थापित झालेली उत्तरी आघाडी असे संबोधले जाते. ही आघाडी म्हणजेच उत्तरी आघाडीमधील विद्रोही लोकांचा विरोध होता ज्यांनी १९९६ ते २००१ या कालखंडात तालिबानी राजवटीचा कडाडून विरोध केला होता.
  • तसेच अहमद शाह मसूद, अमरुल्लाह सालेह यांच्यासह उत्तरी आघाडीमध्ये करीम खलीली, अब्दुल रशीद दस्तुम, अब्दुलाह अब्दुल्लाह, मोहम्मद मोहकीक, अब्दुल कादीर, असीफ मोहसेनी आदींचा समावेश आहे.
  • तालिबानने पंजशीरवर हल्ला केलेला नाही. त्याचे कारण पंजशीरमधील नैसर्गिक परिस्थिती. या नैसर्गिक कारणामुळेच तालिबानी हल्ला करू शकले नसल्याचे म्हटले जाते.
  • तालिबानी राजवटीला कडाडून विरोध केलेल्या अमरुल्लाह सालेह यांच्या ठावठिकाण्यावरून अनेक आडाखे बांधले जात असले, तरी ते पंजशीरमध्ये असल्याचे मानले जाते.

अमरुल्ला सालेह यांचा एल्गार

अहमद मसूद व्यतिरिक्त, अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही तालिबानविरोधातील संघर्ष सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. सालेह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ज्या लाखो लोकांनी मला निवडले त्यांना मी निराश करणार नाही. मी कधीच तालिबानसोबत असणार नाही.

दुसऱ्या ट्विटमध्ये सालेह म्हणाले की, ‘याविषयी अमेरिकेशी बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. आम्हा अफगाणिस्तानांना हे सिद्ध करावे लागेल की अफगाणिस्तान व्हिएतनाम नाही. अमेरिका आणि नाटोच्या विपरीत, आम्ही अद्याप आपला आत्मा गमावलेला नाही.

दरम्यान, सालेह काबूलच्या पंजशीर व्हॅलीमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालिबानचा मुकाबला करण्यासाठी सालेह आणि मसूदची मुले पंजशीरमध्ये एकत्र येत आहेत.

अहमद मसूदने तालिबान विरोधात  मोर्चा उघडला

अफगाणिस्तानवर तालिबानच्या नियंत्रणादरम्यान लोक या ‘दहशतवादी संघटने’विरोधात एकत्र येत आहेत. भूतकाळात तालिबानच्या विरोधात लढलेल्या अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदने आता ‘या संघटने’विरोधात मोर्चा उघडला आहे.

अहमद मसूदने तालिबानविरुद्धच्या या युद्धात जगाकडून मदतही मागितली आहे.

वॉशिंग्टन पोस्टसोबतच्या संभाषणात अहमद मसूद म्हणाला की, ‘मुजाहिदीनचे लढाऊ पुन्हा एकदा तालिबानशी लढायला तयार आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा आहे.

अफगाणिस्तान नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचे नेता अहमद मसूदने तालिबानविरुद्ध संघर्ष सुरू ठेवण्याची घोषणा करून आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छाशक्ती दाखवली आहे.

तो म्हणाला की, ‘मुजाहिद्दीनचे लढाऊ पुन्हा एकदा तालिबानचा मुकाबला करण्यास तयार आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा आहे. माझ्या आवाहनावर अनेक लोक एकत्र आले आहेत.

लष्कराचे अनेक जवानही माझ्याबरोबर आहेत जे तालिबानसमोर गुडघे टेकल्याने संतापले आहेत.

तथापि, अहमद मसूदने कबूल केले की तालिबानशी लढण्यासाठी हे पुरेसे नाही, म्हणून त्याने इतर देशांनाही मदतीचे आवाहन केले.

तो म्हणाला की, तालिबान हा केवळ अफगाणिस्तानच नाही तर संपूर्ण जगाचा शत्रू आहे. त्यांच्या अधिपत्याखाली, अफगाणिस्तान दहशतवाद्यांचा गड बनेल.

हे ही वाचलं का?

Panjshir Resistance

Back to top button