

धायरी : पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रोड परिसरातील नर्हे येथे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवणार्या तरुणाचा जीव वाचविण्याचे अविस्मरणीय काम सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस मार्शल विजय जानराव व सूरज सपकाळ यांनी केले आहे.
नर्हे येथील एका सोसायटीत एक तरुण घरामध्ये फाशी घेण्याच्या तयारीत असल्याचा फोन 18 जून रोजी सायंकाळी साडेआठ वाजता सिंहगड रोड पोलिसांना आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या हद्दीत गस्तीवर असणारे मार्शल जानराव व सपकाळ यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हे दोघे मार्शल तत्काळ नर्हे येथील त्या सोसायटीमध्ये पोहोचले.
दरम्यान त्याठिकाणी एक तरुण घरातील छताच्या पंख्याला बेडशीट बांधून गळफास लावून आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दोन्ही मार्शलनी त्वरित त्या तरुणावर झडप घालून गळफासातून त्याची सोडवणूक केली. त्या तरुणाला तेथून बाजूला घेऊन फाशी घेण्यापासून परावृत्त केले. नर्हे पोलिस चौकीत आणून त्या तरुणाचे समुपदेशन केले.
आत्महत्या करण्यास निघालेल्या तरुणाचा जीव वाचविल्यामुळे नर्हे पोलिस चौकीचे पोलिस मार्शल विजय जानराव व सूरज सपकाळ यांचे सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत कणसे, पोलिस निरीक्षक नितीन जाधव व नागरिकांनी कौतुक व अभिनंदन केले.
हेही वाचा