पालघर जिल्ह्याला एसएनडीटीचे उपकेंद्र मिळणार | पुढारी

पालघर जिल्ह्याला एसएनडीटीचे उपकेंद्र मिळणार

पालघर : पुढारी वृत्तसेवा :  पालघर जिल्ह्यात मुली आणि महिलांना रोजगारक्षम व सक्षम बनविण्यासाठी पालघर जिल्ह्यात एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उपकेंद्रात विविध कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध होणार असून मुलींना आणि महिलांना त्याचा लाभ होणार आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांना या विद्यापीठाने आवाहन केले असून विद्यापीठाच्या  उपकुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी जागेची पाहणी केली असता ही माहिती दिली आहे.

डॉ. चक्रदेव यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर विविध संस्था आणि महाविद्यालयांशी समन्वय साधण्यासाठी एक कार्यालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पालघर न्यायालयाच्या बाजूला लागून असलेल्या विद्यापीठाची जागा सरकारकडे जमा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा येथे उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ती जागा पुन्हा विद्यापीठाच्या नावावर केली असल्याने तिथे उपकेंद्र होणार असल्याचे समजते. दरम्यान, या महिला विद्यापीठांतर्गत फूड प्रोसेसिंग, फॅशन डिझायनिंग किंवा टेक्नॉलॉजी आधारित निवडक प्रायोगिक तत्तावर काही कोर्स सुरूवातीला घेण्यात येणार आहेत. कौशल्य विकासाबरोबरच मूल्यवर्धित अभ्यासक्रम सुरू करून मुलींचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे.

त्यासाठी विविध महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जात असल्याने जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व खासगी संस्था विद्यापीठाशी संलग्न झाल्यास शिवण, वारली पेंटिंग, दागिन्यांच्या डाई या प्रकारचे
विविध कौशल्याधारित आणि तांत्रिक अभ्यासक्रम सुरू झाल्यास महिलांचा आर्थिक व्यवसायालाही हातभार लागणार आहे. या अभ्यासक्रमांचा अवलंब करण्यात यावा, असेही म्हटले आहे.

विद्यापीठासाठी जागा देण्यास जिल्हा प्रशासन तयार
उपकेंद्रासाठी काही अवधी लागणार असला तरी अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. येथे विद्यार्थिनींसाठी असलेल्या  अभ्यासक्रमांची आवश्यकता लक्षात घेता त्या द‍ृष्टीने कौशल्याधारित उपक्रम सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. दरम्यान, तलासरी, जव्हार अशा भागात आवश्यक असलेला अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन विद्यापीठाला जागा व आवश्यक इमारतीही देण्यास तयार असल्याचे समजते.

Back to top button