सीओईपीही होणार ‘तंत्रज्ञान विद्यापीठ’ | पुढारी

सीओईपीही होणार ‘तंत्रज्ञान विद्यापीठ’

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेला (सीओईपी) महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे सीओईपीचे स्वतंत्र विद्यापीठ होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी समाजमाध्यमांव्दारे ही माहिती दिली. सीओईपीला ‘एकाकी तंत्रशास्त्र विद्यापीठा’चा (युनिटरी टेक्निकल युनिव्हर्सिटी) दर्जा देण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. अभय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.

या अहवालानुसार सीओईपीला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत सरकारकडून कार्यवाही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सीओईपीला महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय अधिसूचनेद्वारे घेतला आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. ‘सीओईपी’ला 17 वर्षांपासून स्वायत्त दर्जा असून, देशातील अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून एनआयआरएफ रँकिंगमध्येही चांगली कामगिरी आहे. त्यामुळे ’सीओईपी’ला विद्यापीठाचा दर्जा मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

सांगली : अंदाजपत्रक 48 लाखांचे; काम 36 लाखांचे

मात्र, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याने ‘सीओईपी’ला दर्जा मिळाला नाही. त्यानंतर सामंत यांनी ‘सीओईपी’ला विद्यापीठाचा दर्जा देण्याचे जाहीर केले आणि संबंधित अधिकार्‍यांना कार्यवाही करण्याबाबत आवश्यक सूचना केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ‘सीओईपी’च्या नियामक मंडळाच्या बैठकीत सीओईपीला तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या अधिनियमाचा मसुदा संमत करण्यात आला. याचा पाठपुरावा ‘सीओईपी’चे तत्कालीन संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांनी केला. त्यानंतर या प्रारूपाची तपासणी करण्यासाठी सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती स्थापण्याचा निर्णय घेतला होता.

पुढील वर्षाचे प्रवेश विद्यापीठस्तरावर
सीओईपीला विद्यापीठाचा दर्जा मिळाला असला, तरी विद्यार्थी-पालकांना सीओईपीच्या नव्या दर्जाबाबत माहिती द्यावी लागणार आहे. एक वर्षापूर्वी माहिती द्यावी लागते. या पार्श्वभूमीवर पुढील 2023-24 शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमांचे प्रवेश विद्यापीठस्तरावर होतील, असे सीओईपीचे संचालक डॉ. एम. एस. सुतावणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

फुलेवाडीत आढळला ब्लॅक पर्ल वृक्ष

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : म्हैसाळमधून सीसीटीव्ही, डिव्हीआर जप्त

ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू; तुकोबांची पालखी आज लोणी-काळभोर मुक्कामी

Back to top button