सांगली : अंदाजपत्रक 48 लाखांचे; काम 36 लाखांचे | पुढारी

सांगली : अंदाजपत्रक 48 लाखांचे; काम 36 लाखांचे

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : मिरज येथील प्रभाग क्रमांक 3 मधील रस्ते काँक्रिटीकरण कामाचे अंदाजपत्रक 48 लाख रुपयांचे असताना 36 लाखांचेच काम करून तेवढे बिल काढले आहे. उर्वरीत काम करण्यास ठेकेदाराकडून टाळाटाळ केली जात आहे. याप्रकरणी कारवाईसाठी अहवाल सादर करावा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनी दिले.

महापालिकेत शुक्रवारी स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी सभापती निरंजन आवटी होते. सदस्य संतोष पाटील, फिरोज पठाण, जगन्नाथ ठोकळे, गजानन आलदर, मनगू सरगर, संजय यमगर, करण जामदार, पद्मश्री पाटील, सुनीता राऊत, अनिता व्हनखंडे, सविता मदने, गायत्री कल्लोळी, कल्पना कोळेकर, संगीता हारगे, नर्गिस सय्यद उपस्थित होते.

मिरज येथे मागासवर्गीय विकास निधीतून मंजूर रस्ते काँक्रिटीकरण कामाचे अंदाजपत्रक 48 लाख रुपये आहे. ठेकेदार सर्फराज कच्छी यांनी केवळ 36 लाखांचे काम करून तेवढेच बिल काढले आहे. उर्वरीत काम करण्यास टाळाटाळ करत आहे. याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या ठेकेदाराने सांगलीतही दोन-तीन कामे अडवली असल्याच्या तक्रारी आहेत, अशी माहिती आवटी यांनी दिली.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी एक वर्ष कालावधीकरिता 53 लाख खर्चून 155 टन पी.ए.सी. केमिकल पावडर खरेदीसाठी निविदा मागविण्याचा विषय मंजूर झाला. महापालिका क्षेत्रात सर्व प्रकारच्या मेन पाईप, वितरण व्यवस्थेवरील सार्वजनिक नळ, प्रशासकीय इमारतीचे कनेक्शन, व्हॉल्व्हस्ची गळती व इतर स्वरुपाची दैनंदिन देखभाल दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा विषयक कामांसाठी एक वर्ष कालावधीकरिता अंदाजे 1 कोटींच्या कामांसाठी स्वतंत्र दरकरार एजन्सी नियुक्तीस निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली.

कुपवाड त्रिकोणी बागेसाठी 21.77 टक्के कमी दराची निविदा

कुपवाड शहरातील त्रिकोणी बाग येथील महापालिकेच्या खुल्या जागेमध्ये उद्यान विकसीत करण्याच्या 48 लाखांच्या निविदेस मान्यता दिली. ही निविदा 21.77 टक्के कमी दराची आहे. समतानगर येथे रेल्वे रुळाखालून हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग पद्धतीने ड्रेनेज पाईप टाकण्याच्या निविदेस मान्यता दिली.

एमआयडीसीकडून अपुरा पाणीपुरवठा

एमआयडीसीकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने कुंभारमळा वॉन्लेसवाडी येथे पाणी टंचाई निर्माण झाली असल्याकडे सविता मदने यांनी लक्ष वेधले. पाणी पुरवठ्याबद्दल महापालिका एमआयडीसीला दरमहा 3.50 लाख रुपये रक्कम देत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, नदीपात्रातील पाणी पातळी कमी झाल्याने एमआयडीसीकडून होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

‘अग्निशमन’साठी 2.20 कोटींची 4 वाहने

अग्निशमन दलासाठी 4 वाहने खरेदीस स्थायी समितीने मंजुरी दिली. प्रत्येक वाहनासाठी 55 लाख रुपये याप्रमाणे एकूण 2.20 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

कुपवाडमधील गॅसदाहिनी बंद; पंढरपूर रोडवरील स्मशानभूमी दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

कुपवाड स्मशानभूमीतील गॅसदाहिनी बंद असल्याकडे जगन्नाथ ठोकळे यांनी लक्ष वेधले. गॅसदाहिनी सुरू करण्याच्यादृष्टीने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश आवटी यांनी दिले. मिरजेत पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीच्या दुरुस्तीची गरज असल्याचे अनिता व्हनखंडे यांनी सांगितले. त्यासाठी तरतूद केली जाईल, असे आवटी यांनी सांगितले.

Back to top button